बहुचर्चीत 'मर्दानी 2' या चित्रपटातून निडर आणि वचनबध्द पोलिस अधीक्षक, शिवानी रॉयची भूमिका राणी पुन्हा एकदा साकारताना दिसते. राणी सक्रियपणे आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत असून त्याद्वारे दिला जाणारा संदेश संपूर्ण देशभर पोहचवत आहे. आपल्या अभियानाच्या मार्फत राणी देशभरातील पोलिसांची भेट घेऊन त्यांच्यासोबत स्त्रिया आणि मुलींविरुध्द किशोरवयीन मुलांच्या गुन्ह्यांच्या वाढत असलेल्या सामाजिक समस्येवर बोलत आहे. तसेच ती गुन्ह्यांवर वचक ठेवण्याबद्दल पोलिसांचे कौतुक करताना देखील दिसते. राणीने मुंबईच्या अत्यंत आधुनिक पोलिस कंट्रोल रुमला भेट दिली आणि आपल्या देशात सद्यस्थितीत स्त्रिया व मुलींसाठी भयंकर जोखीम गणल्या जाणाऱ्या सायबर गुन्हेगारी विषयावर चर्चा केली.
राणी मुखर्जी सांगते, ”आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज पोलिसांमार्फत केल्या जाणाऱ्या अमाप कामाला पाहून मी अक्षरश: थक्क झाले आहे. पोलिस अधिकारी अतिशय व्यावसायिक, पध्दतशीरपणे, स्वत:ची पर्वा न करता त्यांचे कर्तव्य निभावतात. आपल्या सुरक्षिततेच्या शाश्वतीसाठी ते किती कष्ट घेतात हे वास्तव डोळे उघडणारे आहे. पीसीआरला दिलेली भेट माझ्यासाठी अतिशय माहितीपर आणि शैक्षणिक स्वरुपाची ठरली, कारण वाढत्या तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या बनणाऱ्या गुन्हांपासून स्त्रियांना आणि मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय केले जाते याच्याबद्दल मला माहिती घेता आली. गुन्ह्यांवर वचक ठेवण्यासाठी अतिशय अभूतपूर्व दर्जाचे काम केले जात आहे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठीच्या पोलिसांच्या महत्वाकांक्षेचे आणि समर्पणाचे मी अगदी मनापासून आभार मानते.”
पीसीआरमध्ये नियुक्त करण्यात आलेला स्त्री पोलिस संघ म्हणतो, ”सायबर गुन्हेगारी ही समस्या आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे, ही समस्या तरुणाईसाठी अतिशय मोठी जोखीम बनली आहे. आमच्याकडे स्विफ्ट रिस्पॉन्स टिम आहे जी आमच्या अधिकृत ईमेल ऍड्रेसवरुन तात्काळ संपर्कात येऊन वायरल होणारी माहिती रद्द करु शकते. मग आम्ही तात्काळ एफआरआर दाखल करतो आणि झालेल्या गुन्ह्याच्या पाळामुळांपर्यंत पोहोचतो.” त्यांनी हे देखील सांगितले की, पीसीआरमधले पोलिस अधिकारी साधारणपणे आठ तास नोकरी करतात, पण आणीबाणीच्या काळात ते अगदी 24 तासांची शिफ्ट देखील करतात! पीसीआर ऑपरेटर्स समस्येला तात्काळ स्पॉट करण्यासाठी आणि आंतर्गत पातळीवर अलार्म देण्यासाठी उच्च तत्वावर प्रशिक्षित केले जाते, ज्यामुळे तात्काळ उपाययोजना करणे शक्य होते. मुंबईला 13 प्रभागांमध्ये विभागले गेले आहे आणि संबंधित प्रमुखांसोबत माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी ऑपरेटर्स नियुक्त करण्यात आले आहेत.
राणी मुखर्जीच्या मर्दानी 2ने थोड्याच अवधीमध्ये संपूर्ण देशावर पकड घेतली आहे. किशोरवयीन मुलांमार्फत स्त्रिया व मुलींवर केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांवर चित्रपटाचे कथानक बेतले आहे. खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या या थरारपटात राणी स्त्रियांना पध्दतशीरपणे निशाणा बनवणाऱ्या क्रूर सिरीयल किलरविरुध्द मोर्चा बांधत असलेली राणी आपल्याला दिसते. मर्दानी 2च्या योगाने तरुण मुलींवर असलेल्या या जोखमीवरच्या चर्चेला नक्कीच वाचा फुटलेली आहे.
मर्दानी 2मध्ये राणी निडर आणि निश्चयी पोलिस अधीक्षक, शिवांगी शिवाजी रॉयची भूमिका बजावत आहे.तिने मर्दानी या सूपरहिट आणि मोठ्या प्रमाणावर कौतुक झालेल्या चित्रपटात तिने बाल तस्करी करणारे रॅकेट याविषयाच्या अनुषंघाने अतिशय सुंदर भूमिका निभावली होती.
आदित्य चोपडांची निर्मिती असलेला मर्दानी 2 राणीच्या जागतिक ब्लॉकबस्टर हिचकी नंतरची रिलिज आहे, हिचकीने जगभरात 250 करोडचा व्यवसाय केला होता. मर्दानी 2 हा सिनेमा 13 डिसेंबर रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.