Join us

‘एक प्यार नगमा’मुळे रानू मंडल बनल्या रातोरात स्टार, त्या गाण्याचा खरा 'नायक’ मात्र उपेक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 2:29 PM

रानू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडल यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. 

सोशल मीडियावर सध्या एका गायिकेची जोरदार चर्चा आहे. तिच्या सुरेल आवाजातलं 'एक प्यार का नगमा' असं काही सुपरहिट झालं की प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. ही गोड गळ्याची गायिका म्हणजे कधी काळी रानाघाटच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागणारी रानू मंडल. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या रानू मंडल यांना हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडल यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. 

एक प्यार का नगमा हे गाणं गात रानू मंडल स्टार बनल्या, मात्र या गाण्याचा खरा नायक आजही उपेक्षित आहे.. हे सुपरहिट गाणं प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनी लिहिलं आहे. मात्र सध्या संतोष आनंद दुर्लक्षित आहेत. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी संतोष आनंद यांना कवी संमेलनांचा आधार घ्यावा लागत आहे.

 

संतोष आनंद यांचे नातेवाईक, मित्र फोन करून रानू मंडल यांच्याबद्दल सांगतात. तुमचं गाणं गाणारी गायिका हिमेश रेशमियाने ब्रेक दिल्याने स्टार बनल्याचे ते संतोष आनंद यांना सांगतात. मात्र आपल्याकडे स्मार्टफोन नाही त्यामुळे रानू यांच्याबद्दल माहित नसल्याचे संतोष आनंद सांगतात.. मुलाच्या मृत्यूनंतर जीवन बेरंग झाल्याची व्यथाही त्यांनी व्यक्त केली आहे. याच संतोष आनंद यांचं उपेक्षित जीणं सध्या काही जणांनी ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर आणलं. 

 

गीतकार  मनोज मुंतसिर यांनी नुकतंच एक ट्वीट केलं. “रानू मंडल यांनी संतोष आनंद यांचं गाणं 'जिंदगी और भी कुछ भी नहीं तेरी मेरा कहानी है' गाणं गायलं आणि त्या रातोरात स्टार झाल्या या गोष्टीचा आनंद आहे. मात्र कोणतं चॅनेल, कुणी संगीतकार, कुणी सांताक्लॉज किंवा मग कुणी रॉबिनहूड संतोष आनंदीजींबद्दल काही बोलेल का? असा सवाल मुंतसिर यांनी ट्विटरवरून उपस्थित केला आहे. हे ट्विट सध्या अनेकजण रिट्विट करत आहेत. 

संतोष आनंद यांनी आजवर 'मैं ना भूलूंगा', 'तेरा साथ है तो', 'मेघा रे मेघा', 'एक प्यार का नगमा है', मुहब्बत है क्या चीज' आणि 'जिंदगी की ना टूटे लड़ी' सारखी गाणी लिहिली आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास २६ चित्रपटांसाठी १०९ गाणी लिहिली आहेत. संतोष आनंद यांनी १९७४ पासून गाणी लिहायला सुरुवात केली. मात्र सध्या संतोष आनंद यांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. त्यांच्याप्रमाणे अनेकजण आयुष्याच्या संध्याकाळी उपेक्षिताचं जीणं जगत आहेत. 

टॅग्स :राणू मंडलहिमेश रेशमिया