सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा सुळसुळाट झालाय. कोण कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. आता तर देवस्थानांवरही फोटो, व्हिडिओ, रील्स शूट करण्याचं प्रमाण वाढलंय. धार्मिक स्थळांचं तरी पावित्र्य राखा असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. काही दिवसांपूर्वीच केदारनाथ मंदिरासमोर एका कपलचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये महिला तिच्या बॉयफ्रेंडला मंदिरासमोरच प्रपोज करताना दिसते. या व्हिडिओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असतानाच अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) मात्र यात काय चूक आहे असा प्रश्न विचारलाय.
अभिनेत्री रवीना टंडनने ट्वीट करत लिहिले, 'आपले देवदेवता प्रेमाच्या विरोधात कधी गेले? या कपलला त्यांचा हा खास क्षण मंदिरासमोर साजरा करायचा होता आणि आशिर्वाद घ्यायचे होते तर यात काय चूक आहे. बहुदा आता पाश्चिमात्य पद्धत जास्त सुरक्षित झाली आहे. गुलाब, मेणबत्ती आणि चॉकलेट. ही कारवाई अशा लोकांविरोधात झाली आहे जे केवळ त्यांच्या नात्यासाठी आशिर्वाद घेत होते. हे खूपच दुर्देवी आहे.'
दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर प्रशासनाने त्या जोडप्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावरच रवीनाने नाराजी व्यक्त केली आणि त्या जोडप्याला पाठिंबा दिला. रवीनाने घेतलेल्या या भूमिकेवर अनेक जणांनी सहमती दर्शवली आहे. पण काही जणांनी मंदिर हे पवित्र स्थान असून रोमान्सची जागा नाही असं खडसावून सांगितलंय.