Ranveer Allahbadia: प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया हा समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या (India's Got Latent Controversy Row) कार्यक्रमात अश्लील आणि वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर वादात अडकला. शोमध्ये आई वडिलांवरुन केलेल्या अश्लील विधानामुळे त्याला टीकेचं धनी व्हावं लागलं. काही दिवस तो सोशल मीडियापासून दूर होता. तसेच त्यानं कुठलंही पॉडकास्ट प्रदर्शित केलं नव्हतं. आता 'इंडियाज गॉट लेटेंट' शोच्या वादानंतर आता रणवीरनं नवी सुरुवात करत पुन्हा एकदा आपलं पॉडकास्ट (Ranveer Allahbadia Podcast) सुरू केलं आहे.
रणवीर अलाहबादियानं कमबॅक केलं आहे. रणवीरनं 'इंडियाज गॉट लेटंट' शोमधल्या वाद-विवादानंतर आपलं पहिलं पॉडकास्ट युट्यूब चॅनल टीआरएस चॅनलवर शेअर केलं आहे. यामध्ये रणवीर अलाहाबादिया बौद्ध भिक्षू पालगा रिनपोछे यांच्याशी चर्चा केली आहे. पॉडकास्टमध्ये पालगा रिनपोछे यांनी म्हटलं, "तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या कामाबद्दल मी आभारी आहे, या व्यासपीठाच्या माध्यमातून लाखो लोकांना फायदा झाला आहे. अनेक जाणकार लोकांनी इंटरनेट, यूट्यूब, अॅप्स आणि स्पॉटीफायद्वारे त्यांचं कौशल्य इतरांसोबत शेअर केलं आहे. तुम्ही हे महान कार्य करत राहावं, अशी मी नेहमीच प्रार्थना करेन, केवळ लोकांना शिक्षितच नाही तर प्रेरणाही देत राहा. तसेच, ज्ञानाचा प्रसार करत रहा. आजकाल लोकांकडे भरपूर ज्ञान आहे, पण त्यांना प्रेरणेचा अभाव आहे. तुमचं माध्यम या बाबतीत खूप उपयुक्त ठरलं आहे. मी तुम्हाला हे चांगलं काम सुरू ठेवण्याची विनंती करतो".
रणवीर म्हणाला, "आपण आयुष्यात आधी दोनदा भेटलो आहोत आणि जेव्हा मी अडचणीत होतो, तेव्हा तुम्ही नेहमीच माझ्या मदतीला आला आहात. मी एका मोठ्या आव्हानाला तोंड देतोय, ज्याचा विचारही मी कधीही केला नव्हता. म्हणून मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, तुम्हाला भेटून आनंद झाला".
दरम्यान, अलीकडेच रणवीरनं व्हिडीओ शेअर करत सर्वांची माफी मागितली होती आणि एक संधीची विनंती केली होती. तसेच या काळात त्याच्या पाठिशी उभे राहिलेल्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्याने आभार मानले होते. रणवीरच्या यूट्यूब चॅनेलचे १ कोटी ४ लाख सबस्क्राइबर्स आहेत. तो 'बीयरबाइसेप्स' म्हणून देखील ओळखला जातो. त्याचा पॉडकास्ट शोमध्ये आतापर्यंत अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. युट्यूबच्या माध्यमातून तो मोठी कमाई करतो. डीएनएने दिलेल्या, २०२४ मध्ये त्याची एकूण संपत्ती ६० कोटी होती आणि त्यांचे मासिक उत्पन्न ३५ लाखांपर्यंत आहे. याव्यतिरिक्त, तो टॅलेंट मॅनेजमेंट आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सीमधूनही कोट्यवधी कमावतो.