अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार आहेत. मात्र दोघांनीही अद्याप एकत्र काम केलेलं नाही. तरी नुकतेच हे दोघं एका इव्हेंटसाठी एकत्र दिसले. काल रविवारी वाराणसी येथील नमो घाटावर दोघांनी रॅम्प वॉक केला. सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्राही यावेळी उपस्थित होता. इंडियन मायनॉरिटी फाऊंडेशनच्या दोन दिवसीय 'धरोहार काशी की' कार्यक्रमानिमित्त ते एकत्र आले होते.
वाराणसीच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी रणवीर सिंह आणि क्रिती सेनन मनीष मल्होत्रा डिझानयर वेशभूषेत वाराणसीत दाखल झाले. तिघांनी आधी काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली. 'धरोहार काशी की' कार्यक्रमात क्रिती सेनन ब्रायडल आऊटफिटमध्ये दिसली. तिने मरुन रंगाचा घागरा चोली परिधान केला होता. यामध्ये काशीची झलक दिसत होती. हा आऊटफिट तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा काळ लागला.
अभिनेता रणवीर सिंहने वाराणसीत झालेला रॅम्प वॉक हा मुंबईच्या पंचतारांकित हॉलमध्ये होणाऱ्या शोपेक्षा चांगला असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, "बुनकर समुदायाची रक्षा आणि प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी जे केलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. पंतप्रधानांनी १० वर्षात काशीचा कायापालट केला आहे. काशी देशाचं प्रतिनिधित्व करतं. आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे."
क्रिती सेनननेही आनंद व्यक्त केला आणि म्हणाली,"मला नेहमीच हँडमेड काहीतरी परिधान करायचं होतं जे आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतं. बनारसी साडीची हीच खासियत आहे. एक पीस विणण्यासाठीही कितीतरी दिवस जातात. अशा कारीगरीबाबत जगातील सर्वच लोकांना माहित असलं पाहिजे. या कार्यक्रमाचा मी भाग झाले याचा मला आनंद आहे. काशी विकास आणि वारसाचं उत्तम उदाहरण आहे."