ठळक मुद्देएका चाहत्याने रणवीरचा माफी मागणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. रणवीरवर टीका करण्यापूर्वी, त्याच्याबद्दल भलेबुरे लिहिण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा, अशी विनंती या चाहत्याने केली आहे.
‘कॉफी विद करण 6’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये येऊन महिलांबद्दल अपशब्द बोलणे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के एल राहुल यांना चांगलेच महागात पडले. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोघांवर प्रचंड टीका झाली. हा वाद इतका विकोपाला पोहोचला की, दोघांवरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) निलंबनाची कारवाई केली. दोघांनाही आॅस्ट्रेलिया दौ-यातून माघारी बोलावण्यात आहे. या वादानंतर पांड्या व राहुल दोघांनाही माफीही मागावी लागली. हे सगळे प्रकरण ताजे असताना अचानक बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, या व्हिडिओत रणवीर आपल्या एका वादग्रस्त विधानासाठी माफी मागताना दिसतोय.
रणवीर करण जोहरच्याच ‘कॉफी विद करण’च्या सेटवर आहे आणि यादरम्यान मुलींबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल तो माफी मागतो आहे. यापूर्वी रणवीरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो मुलींबद्दल आक्षेपार्ह बोलताना दिसला होता. यावरून रणवीरवर टीकाही झाली होती. अखेर रणवीरला या सगळ्यांतून बाहेर काढण्यासाठी एका चाहत्याने त्याचा माफी मागणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. रणवीरवर टीका करण्यापूर्वी, त्याच्याबद्दल भलेबुरे लिहिण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा, अशी विनंती या चाहत्याने केली आहे.
अर्थात अनेकांनी हा व्हिडिओ बघूनही रणवीरला लक्ष्य केलेच. रणवीरने अनुष्का शर्मा व करिना कपूरबद्दल केलेल्या विधानासाठी माफी मागितलेली नाही, याकडे काहींनी लक्ष्य वेधले. रणवीरने करिना कपूरला ‘गर्विष्ट’ म्हटले होते.
तूर्तास रणवीर सिंग ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तो आलिया भट्ट सोबत दिसणार आहे. यापूर्वी रणवीरचा ‘सिम्बा’ रिलीज झाला होता. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. अद्यापही या चित्रपटाची घोडदौड सुरुच आहे.