बॉलिवूडचा आघाडीचा सुपरस्टार रणवीर सिंग याचे असंख्य चाहते आहेत. रणवीरवर जीव ओवाळून टाकणारे हे चाहते रणवीरसाठी काहीही करायला तयार आहेत. रणवीरच्या एका फॅनक्लबने काय करावे, तर गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात राहणा-या एका आदिवासी पाड्यापर्यंत प्रकाश पोहोचवला.होय, इन्स्टाग्रावर रणवीरच्या नावाचे अनेक फॅनक्लब आहेत. या चाहत्यांना रणवीर चांगल्या कामासाठी प्रेरीत करतो. काही फॅनक्लब रणवीरच्या वाढदिवशी अनाथालयात भोजन वाटतात. काही कपडे देतात. यावर्षी मध्यप्रदेशातील रणवीरच्या एका फॅनक्लबने एक नवा आदर्श घालून दिला. या याच फॅनक्लबमधील ३५ जणांनी भिवंडीमधील अकलोली या गावाजवळ १० सोलर लाईट बसविले. शिवाय गावातील १० पैकी पाच घरांपर्यंत वीज पोहोचवली. रस्त्यांवर ५ लाईट लावत त्यांनी गावातील अंधार दूर केला.
या फॅनक्लबमध्ये इंदूरमधील डॉ. आमिर अली आणि डॉ. राहुल यादव यांचा समावेश आहे. डॉ. आमिर अली यांनी सांगितले की, रणवीरचा वाढदिवस ६ जुलै रोजी असतो. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त समाजकार्य करतो. रणवीरनेही आमच्या या कामाची दखल घेतली होती. त्याने आमचे काम पाहून आमची पाठ थोपटली. त्याच्या प्रेरणेने आम्हाला नवा हुरूप आला. यानंतर आम्ही ‘रणवीर ग्राम’ ही योजना सुरु केली या योजनेअंतर्गत आम्ही काही गावांचे सर्वेक्षण केले. यावेळी आम्हाला मुंबईजवळील काही गावांविषयी माहिती मिळाली. या गावात अजूनही वीज पोहोचलेली नव्हती. त्यानंतर आम्ही येथे सोलारलाईट बसविण्याचा निर्णय घेतला’.
रणवीर कोण हेही त्यांना ठाऊक नाही
अकलोली गावातील लोकांना रणवीर सिंग कोण हेही ठाऊक नाही. गावापर्यंत वीज पोहोचवणारे रणवीरचे चाहते कोण, हेही त्यांच्या गावी नाही. पण गावातील अंधार दूर होताच सगळेच आनंदात आहेत. याच गावात राहणारी आशा तर गावात लाईट आल्याने प्रचंड सुखावली आहे. आम्ही अनेक वर्षे जंगलात राहत आलोय. आमच्याकडे वीजेचा कुठलाही स्रोत नव्हता. पण आता गावातील मुलांना दिवाखाली अभ्यास करावा लागणार नाही, याचा मला आनंद आहे, असे आशाने सांगितले.