अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट्टसह अनेक प्रसिद्ध लोकांचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. डीपफेक व्हिडिओबद्दल ज्या व्यक्तिला माहिती नाही, त्याला हे व्हिडीओ खरेही वाटतात. सध्या निवडणुकीत बॉलिवूड अभिनेते पक्षात प्रचार करत असलेले डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातच आता रणवीर सिंगचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. आता रणवीरने या डीपफेक व्हिडीओवर कारवाई केली आहे.
रणवीर सिंगनं एआय जनरेट केलेल्या डीपफेक व्हिडिओविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. रणवीर सिंग नुकताच क्रिती सनॉनलाआणि मनीष मल्होत्रासोबत एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी वाराणसीला पोहोचला होता. यातच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ बोलताना दिसत आहे. मात्र, बारकाईने पाहिल्यास व्हिडीओच्या ऑडिओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचं लक्षात येतं. या व्हिडीओमध्ये AI च्या माध्यमातून व्हॉईस क्लोनच्या मदतीने त्याचे शब्द बदलण्यात आले आहेत.
रणवीरने सायबर क्राईम सेलमध्ये आपली तक्रार नोंदवली असून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा तपास सुरू केला आहे. रणवीरच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आम्ही रणवीर सिंगच्या या डीपफेक व्हिडीओची जाहिरात करणाऱ्या हँडलविरुद्ध तक्रार दाखल केली आहे'. यासोबतच रणवीर सिंगनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत डीपफेकपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. त्यानं इन्स्टा स्टोरीवर मजकूर शेअर करत लिहिलं, 'मित्रांनो, डीपफेकपासून सावध राहा'. यासोबतच त्याने धोक्याचे चिन्हही शेअर केले आहे.
एआय प्रणालीचा वापर करून तयार डीपफेक तयार केले जातात. सध्या डीपफेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, या व्हिडीओत सेलिब्रेंटींचे चेहरे मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. याआधीही अनेक कलाकार याला बळी पडले. तंत्रज्ञानाच्या निव्वळ गैरवापरामुळे हे घडत असून, त्यावर कठोर कारवाईही केली जात आहे. यात सेलिब्रेटींच्या चेहऱ्याचा गैरवापर केल्याचे मोठ्याप्रमाणात घडले आहे.