सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आला असून कुणी खेळाडूवर चित्रपट बनवतो आहे तर कुणी कलाकार किंवा दिग्गज व्यक्तींवर. अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत 'संजू' चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने अनेक नवे रेकॉर्ड बनवले. आता बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारनेही आपल्या आयुष्यावर आधारित बायोपिकबद्दल मत मांडले आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोलत असताना आपल्या बायोपिकमध्ये रणवीर सिंगने आपली भूमिका करावी, अशी इच्छा अक्षयने व्यक्त केली आहे. या दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांनी 'कॉफी विथ करण'च्या एका भागात हजेरीदेखील लावली होती. या शोमध्ये रणवीरने आपण अक्षय कुमारचा चाहता असल्याचेही म्हटले होते.
रणवीरने नुकतेच आगामी चित्रपट 'सिम्बा'चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. दुसरीकडे अक्षयनेही अनेक अडथळ्यांनंतर 'हाऊसफुल ४'चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. अक्षय सध्या आपल्या आगामी मिशन मंगल चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे आणि लवकरच त्याचा आगामी चित्रपट '२.०' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात रजनीकांत आणि अक्षय कुमार दोघे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात अक्षय व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. यात वीएफएक्सचे जबरदस्त काम आहे. 2.0 सिनेमाच्या रिलीज आधी त्याने प्रभासच्या बाहुबली2 चा रेकॉर्ड तोडला आहे. बाहुबली सिनेमा 2017 मधला सर्वात हिट ठरला होता. यासिनेमाचे वैशिष्ट म्हणजे यातले वीएफएक्स होते. 'बाहुबली 2' देशभरातील 6500 स्क्रिनवर रिलीज करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार रजनीकांत यांच्या 2.0 सिनेमाने बाहुबलीला मागे टाकले आहे. 2.0 6800 स्क्रिनवर रिलीज करण्यात येणार आहे.