कोरोना व्हायरसचा संसर्ग नको म्हणून बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. रणवीर सिंग व दीपिका पादुकोण हेही त्यापैकीच एक . रणवीर व दीपिका सध्या एकमेकांसोबत कॉलिटी टाईम घालवत आहेत. अर्थात सोशल मीडियावरून दोघेही चाहत्यांच्या संपर्कात आहेतच. सध्या रणवीरच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेय. होय, रणवीरने खास आपल्या सासरेबुवांसाठी म्हणजेच प्रकाश पादुकोण यांच्यासाठी ही खास पोस्ट लिहिली आहे. निमित्त काय तर, 40 वर्षांपूर्वी प्रकाश पादुकोण यांनी लंडनच्या वेम्बले एरेनामध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकली होती. सासरेबुवांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे स्मरण करत, रणवीरने पोस्ट लिहिली असून काही फोटोही शेअर केले आहेत.
‘40 वर्षांपूर्वी प्रकाश पादुकोण यांनी बॅडमिंटन जगतात इतिहास रचला होता. तो एक ऐतिहासिक व अभूतपूर्व दिवस होता़ तो दिवस आमच्या कायम स्मरणात असेल...,’ असे रणवीरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.दीपिका पादुकोण हिनेही यानिमित्ताने पापा प्रकाश पादुकोण यांचे अभिनंदन केले.
‘पापा, बॅडमिंटन व भारतीय क्रीडा क्षेत्रातील तुमचे योगदान अभूतपूर्व आहे. दुस-यांना सतत प्रेरणा देणारे तुमचे समर्पण, शिस्त, कटिबद्धता आणि वर्षांची कठोर मेहनत... या सगळ्यांसाठी खूप सारे प्रेम़ आम्हाला तुमचा अभिमान आहे,’ असे दीपिकाने लिहिले आहे.
यापूर्वीही अनेकदा दीपिकाने सोशल मीडियावर तिच्या पापांबद्दल अशा अभिमानास्पद पोस्ट लिहिल्या आहेत. दीपिका पादुकोण आपल्या आईपेक्षाही पापांच्या जवळ आहे. प्रकाश पादुकोण यांच्यापासून प्रेरणा घेत, दीपिकानेही बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली होती. लहान वयात ती राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये खेळली. पण कालांतराने तिने मॉडेलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पुढे अभिनेत्री झाली. आज दीपिका बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.