रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीरसह 83 सिनेमाची संपूर्ण टीम धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेताना दिसतोय. धर्मशालाच्या मैदानावर आणि जीममध्ये रणवीर चांगलाच घाम गाळताना दिसतोय. रणवीर या व्हिडीओत क्रिकेटमधले बारकावे शिकताना दिसतोय.
स्वत: कपिल देव या व्हिडीओत रणवीर सिंगला क्रिकेटचे धडे देताना दिसतायेत. अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरने या कॅम्पमधील एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. टीमसोबत सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानसुद्धा दिसतोय. या कॅम्प दरम्यानचे अनेक फोटो याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
क्रिकेट वर्ल्डकप १९८३ भारतासाठी विशेष होता. बलाढ्य वेस्ट इंडिज टीमला फायनलमध्ये चारीमुंड्या चीत करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. या ऐतिहासिक विजयामुळे तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. कपिल देव यांच्या त्या भारतीय टीमचं नाव सुवर्णाक्षरांनी क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलं.
आता भारतीय क्रिकेट टीमचा पहिला वर्ल्डकप जिंकल्याचा हाच पराक्रम रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.