सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी यंदा अनेक कलाकार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याशिवाय काही कलाकार उघडपणे मतं व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत रणवीर भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतोय. काय आहे रणवीरच्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य बघूया.
रणवीर सिंगचा व्हिडीओ ट्विटरवर एका युजरने शेअर केलाय. या व्हिडीओत रणवीर म्हणताना दिसतो, "सामान्य माणसांचं दुःख आणि वेदनांना सेलिब्रेट करणं हाच मोदींजीचा उद्देश आहे. वाढती महागाई आणि गरीबीला मोदीजी सेलिब्रेट करत आहेत. सध्याची भारताची परिस्थिती भीषणतेकडे झुकली आहे. त्यामुळे भारताच्या विकासाला न्याय देणं हे कोणीही विसरता कामा नये. त्यामुळे विचार करा आणि मतं द्या."
काय आहे या व्हिडीओमागचं सत्य?
रणवीरचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झालाय. पण हा व्हिडीओ तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला कळेल की, रणवीरचा आवाज आणि त्याचं बोलणं मॅच होत नाहीय. त्यामुळे हा व्हिडीओ डब करुन कोणीतरी पसरवला आहे. या व्हिडीओमागचं सत्य म्हणजे, रणवीर अलीकडेच वाराणसीला गेला होता. त्यावेळी त्याने मीडियाशी संवाद साधला होता. तोच व्हिडीओ डब करत रणवीर मोदींची टीका करतोय हे चुकीचं पसरवण्यात आलंय