अभिनेता रणवीर सिंगला बॉलिवूडचे ‘पॉवर हाऊस’ म्हटले जाते. याचे कारण म्हणजे, रणवीर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. रिल लाईफ असो वा रिअल लाईफ तो प्रचंड एनर्जेटिक आहे. भूमिका कुठलीही असो पडद्यावर ती जिवंत करताना रणवीर अगदी जिवाचे रान करतो. पण म्हणून पोटावर स्टॅपल कोण करेल? मात्र रणवीरने तेही केले. होय, विश्वास बसणार नाही पण, एका चित्रपटाच्या सेटवर रणवीरने स्वत:च्या पोटावर स्टॅपलरने पीन स्टॅपल केले होते. खरे तर आपण याची कल्पनाही करू शकत नाही. पण रणवीरने हा कारनामा केला. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वत:च याची माहिती दिली.
रणवीर ‘लुटेरा’चे शूट करत होता. या एक सीन होता. या सीनमध्ये रणवीरला चेह-यावर प्रचंड वेदना दर्शवायच्या होत्या. चेह-यावर वेदनेचे खरे भाव दाखवण्यासाठी रणवीरने काय करावे तर पोटावर स्टॅपल केले आणि मग वेदनेने विव्हळत हा सीन पूर्ण केला.
याबद्दल रणवीरने सांगितले की, ‘ प्रत्यक्षात मला कधीच गोळी लागली नव्हती. मात्र पडद्यावर मात्र मला गोळी लागणार होती. साहजिकच गोळी लागल्यानंतरच्या वेदना कशा असतात, हे मला ठाऊक नव्हते. पण मला चेह-यावर अगदी नैसर्गिक भाव दाखवायचे होते. म्हणून मी पोटाला स्टॅपल केले. मी इतका विव्हळत होतो की, त्याच वेदनेत मी तो सीन शूट केला. ’
सध्या रणवीर सिंग ‘83’ या सिनेमात बिझी आहे. ‘83’ हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. १० एप्रिल २०२०ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.