अभिनेता रणवीर सिंग गली बॉय चित्रपटात रॅपरच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याने मुराद नामक रॅपरची भूमिका केली होती जो स्लममध्ये राहून प्रसिद्ध रॅपर बनतो. याच भूमिकेमुळे प्रेरित होऊन नुकतेच रणवीरने स्वतंत्र म्युझिक रेकॉर्ड लेबल इंक इंक लाँच केले. रणवीरने चित्रपटाचे निर्माते आणि संगीत रसिक नवजार इरानीसोबत मिळून हे लेबल लाँच केले आहे. यामार्फत नवीन टॅलेंटचा शोध घेतला जाणार आहे आणि ज्यांचा कुणीही गॉडफादर नाही अशा नवीन गायकांना संधी देण्यात येणार आहे.
इंक इंकने आपले पहिला सिंगल व म्युझिक व्हिडिओ जहरदेखील यावेळी अनावरण केले. यासोबत तीन नवीन गायकांना देखील लाँच करण्यात आले.
याबद्दल रणवीरने सांगितले, 'आम्ही सुरुवातीला अगदीच कच्चे, परंतु अतिशय टॅलेंट असलेले नवीन प्रकारचे रॅप व हिप-हॉप कलाकार शोधत आहोत जे भविष्यात सुपरस्टार होतील. आजच्या काळात भारतीय संगीतात रॅप व हिप-हॉपचा जमाना आहे. कविता हे क्रांतीचे काव्य आहे, जे भारतातील वर्णभेद, अन्याय आणि समाजातील एट्रोसिटी विरोधात निषेध करणारे भाष्य करते. हा भारताचा आवाज आहे, भारताच्या रस्त्यावरचा.. ज्याकडे तुम्ही आणखी दुर्लक्ष करू शकत नाही. हिंदुस्तानी रॅप व हिप-हॉप आपल्या राष्ट्राची कथा व वास्तव सांगते. आम्हाला इंक इंकमध्ये आपल्या पिढीतील कवी आणायचे आहेत. '
इंक इंकचा शब्दशः अर्थ म्हणजे स्वत:ची कथा लिहिणे. सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या या पॅशन प्रोजेक्टची सुरुवात करण्यासाठी मी अतिशय प्रेरीत व उत्सुक आहे. मला आशा वाटते की, आम्ही जगासमोर भारतीय तरुणांचे बुलंद, आक्रमक आवाज सादर करू, असे रणवीरने यावेळी सांगितले.