Join us

रवीना टंडनच्या दत्तक मुलींसोबत कसं आहे राशा थडानीचं नातं? म्हणाली, "दोन गट आहेत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 15:40 IST

रवीना टंडनने वयाच्या २१ व्या वर्षीच दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.

रवीना टंडन (Raveena Tandon) ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्यावर लाखो घायाळ व्हायचे. अक्षय कुमारसोबत तिचं अफेअर तर खूप गाजलं होतं. नंतर तिने बिझनेसमन अनिल थडानीसोबत लग्न केलं. तिला एक मुलगा एक मुलगी आहे. पण तुम्हाला माहितीये का रवीनाला लग्नाआधीच दोन मुली होत्या. होय, तिने वयाच्या २१ व्या वर्षीच १९९५ साली दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यांची जबाबदारी घेतली होती. पूजा आणि छाया अशी त्यांची नावं आहेत. या दोघींसोबत रवीनाची लेक राशा थडानीचं (Rasha Thadani) कसं नातं आहे माहितीये का?

राशा थडानीने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'फेमिना'ला दिलेल्या मुलाखतीत राशाला तिच्या दोन्ही बहिणींसोबत कसं नातं आहे असं विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, "आम्ही चारही भाऊ बहीण नेहमी दोन टीममध्ये असतो. रणबीर आणि छाया एका टीममध्ये असतात. मी आणि पूजा एका टीममध्ये असतो. आमच्यात नुसता वेडेपणा, मस्ती सुरु असते. छाया दीदी आणि रणबीर दोघांचाही स्वभाव थोडा शांत आहे. पूजा दीदी आणि मी...आम्ही त्यांच्याशी भांडतो, वाद घालतो."

रवीनाने पूजा आणि छायाला दत्तक घेतलं तेव्हा त्या दोघींचं वय ८ आणि ११ वर्ष होतं.  या दोघी माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत असं रवीनाने म्हटलं होतं. पूजा एअर हॉस्टेस आहे तर छाया इव्हेंट मॅनेजर आहे. छायाचं लग्नही झालं असून तिला दोन मुलंही आहेत. 

टॅग्स :रवीना टंडनराशा थडानीपरिवारबॉलिवूड