दाक्षिणात्य ब्युटी आणि पुष्पा सिनेमातून देशभरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री रश्मिक मंदाना सध्या चांगलीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या लावणीमुळे मराठी चाहतेही तिच्या अदांवर फिदा झाले होते. तर, आगामी चित्रपटांच्या निमित्तानेही ती सिनेसृष्टीत चर्चेत असते. मात्र, आता ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. कारण, रश्मिका ही मॅकडॉनल्ड कंपनीसाठी दक्षिण भारतात ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून काम करते. मात्र, ऑनलाईन फूड डिलिव्हरी किंवा खरेदीत ग्राहकांना होणारा त्रासच तिने व्हिडिओतून शेअर केलाय. तिच्या या व्हिडिओवर चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत.
अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट केलीय. त्यामध्ये, तिने व्हिडिओ शेअर केला असून ती मॅकडॉनल्ड कंपनीच्या पिशवीतून एक वस्तू बाहेर काढताना दिसून येते. रश्मिकाच्या हाती आलेली ती वस्तू म्हणजे वाळूचं घड्याळ असल्याचं दिसून येतं. मी बर्गरची ऑर्डर दिली होती, आणि मला एक तासाचा ग्लास (रेतीचे घड्याळ ) मिळाल्याचे रश्मिकाने आपल्यापोस्टमध्ये म्हटलंय. तसेच, @mcdonaldsindia याचा अर्थ काय? असा सवालही तिने मॅक डी कंपनीला केला आहे. त्यामुळे, रश्मिकाला खरंच मॅक डीकडून बर्गरऐवजी घड्याळ मिळालंय का, की कंपनीच्या प्रमोशनसाठी हा व्हिडिओ बनवलाय हे पाहावं लागेल.
रश्मिकाच्या या पोस्टवर चाहत्यांकडूनही मजेशीर रिप्लाय येत आहे. वेळ संपण्यापूर्वीच खाऊन घ्या, असं एका चाहत्याने म्हटलंय. तर, तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहण्यासाठी काही वेळ लागेल, तोपर्यंत ह्या घड्याळासोबत वेळ घालवा, असेही दुसऱ्या चाहत्याने म्हटलंय.