साऊथ सेन्सेशन रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या जाम वैतागली आहे आणि याचं कारण आहे, सततचं ट्रोलिंग. होय, तिच्याबद्दल पसरवला जात असलेला द्वेष, सतत लिहिल्या जात असलेल्या नकारात्मक गोष्टी यामुळे ती दु:खी आहे. इतकी की, एक लांबलचक पोस्ट लिहून तिने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. या सगळ्या नकारात्मकतेवर मी इतकी वर्ष गप्प का राहिले? मी वेळीच हे रोखलं का नाही? असा पश्चाताप तिला होतोय. ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ बघितला नाही, यावरून अलीकडे रश्मिकाला जबरदस्त ट्रोल करण्यात आलं होतं. हे पाहून रश्मिका संतापली आणि तिने एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला.
ट्रोलर्ससाठी जणू मी पंचिंग बॅग आहे...आपल्या इन्स्टा अकाऊंटवर रश्मिकाने एक फोटो शेअर केला आहे. सोबत भलीमोठी पोस्ट. या पोस्टमध्ये ती लिहिते, ‘ गेल्या काही दिवसांपासून, आठवड्यांपासून,महिन्यांपासून किंवा मग अनेक वर्षांपासून मला काही गोष्टी त्रास देत आहेत. वेळ आली की मी यावर बोलेल, असं मी ठरवलं होतं. कदाचित हीच ती योग्य वेळ आहे. मी फक्त स्वत:बद्दल बोलते आहे. खरं तर काही वर्षांआधीच मी हे बोलायला हवं होतं. मी जेव्हा करिअर सुरू केलं होतं, तेव्हा मला प्रचंड नकारात्मकतेचा सामना करावा लागला. आता तर मी ट्रोलर्ससाठी जणू पंचिंग बॅग बनली आहे. मी जे आयुष्य निवडलं, त्यासाठी मला मोठी किंमत चुकवावी लागणार, हे मला माहित आहे. मी प्रत्येकाला आवडू शकत नाही. माझी तशी अपेक्षाही नाही. पण याचा अर्थ हा नाही की, मी तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही माझ्याबद्दल नकारात्मक पसरवाल. तुम्हा लोकांना खुश्श करण्यासाठी मी रोज किती मेहनत करते, हे फक्त मलाच ठाऊक आहे. माझं काम पाहून लोकांना आनंद वाटावा, त्यांचं मनोरंजन व्हाव, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्याबद्दल तुम्हाला आणि मला स्वत:ला अभिमान वाटावा, अशाच गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करते. पण सततचं ट्रोलिंग पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होतात. जे मी कधी बोलले नाही, त्याबद्दल मला शिव्या घातल्या जातात, ते पाहून मला दु:ख होतं.’
पुढे रश्मिका म्हणाली, ‘मुलाखतीत मी बोललेल्या गोष्टी माझ्याविरोधात वापरल्या जातात. इंटरनेटवर चुकीच्या पद्धतीने माझ्याविरोधात गोष्टी पेरल्या जातात. हे माझ्यासाठी हानीकारक ठरू शकतं. इंडस्ट्रीत आणि इंडस्ट्रीबाहेरची माझे नातेसंबंध खराब करू शकतं. मी सगळ्या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करावं, असं मला सांगितलं गेलं. पण मी असं केल्यावर गोष्टी आणखी बिघडल्या. हे लिहून कुणाचं मन जिंकण्याचा माझा हेतू नाही...’
रश्मिकाच्या पोस्टचं अनेक सेलिब्रिटींनी समर्थन केलं आहे. दुलकर सलमान, एली अबराम, हंसिका मोटवानी यांनी रश्मिकाला सपोर्ट केला आहे. अलीकडे रश्मिका एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी तू कांतारा पाहिलास का? असा प्रश्न तिला विचारला गेला होता. यावर अद्याप नाही, असं रश्मिका म्हणाली होती आणि यावरून युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती.