रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्याची सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूड आणि साऊथ अशा दोन्ही क्षेत्रात तिचं नाव आहे. नुकताच रिलीज झालेल्या 'छावा' सिनेमातही ती मुख्य अभिनेत्री आहे. शिवाय यापुढेही तिच्याकडे सिनेमांची रांग आहे. २०२१ साली आलेल्या 'पुष्पा' सिनेमानंतर तिला 'नॅशनल क्रश' हा टॅग मिळाला होता. तिच्या चाहतावर्गात कमालीची वाढ झाली. मात्र या टॅगचा करिअरमध्ये काहीच फायदा नसल्याचा खुलासा रश्मिकाने नुकताच केला आहे.
रश्मिका मंदानाला आजही 'नॅशनल क्रश' असं संबोधलं जातं. पण एक अभिनेत्री म्हणून तिला कोणत्याच टॅगचा काहीच फरक पडत नाही असं ती म्हणाली. एका मुलाखतीत रश्मिका सांगते, "मला नाही वाटत की कोणत्याही टॅगचा तुमच्या करिअरला फायदा होतो. उलट प्रेक्षक, चाहत्यांचं प्रेमच करिअरमध्ये साथ देतं. तेव्हाच तुम्ही प्रगती करता. चाहत्यांनीच मला नॅशनल क्रशचा टॅग दिला पण तो फक्त एक टॅग आहे. लोकांना माझ्या कामावर प्रेम आहे."
ती पुढे म्हणाली, "माझे चित्रपट पाहण्यासाठी लोक तिकीट काढून येतात. माझ्यासाठी हेच प्रेम आहे. हीच करिअरमधली प्रगती आहे. मला ना की एखाद्या टॅगने पण केवळ प्रेक्षकांच्या प्रेमानेच फरक पडतो. मी आतापर्यंत २४ चित्रपट केले. मला प्रेक्षकांनी सिनेमाच्या माध्यमातून इतकं प्रेम दिलं यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. माझा हा प्रवास अद्भूत आहे. मी माझ्या प्रेक्षकांसोबत खूप जोडले गेले आहे. सध्या मी जसे सिनेमे करत आहे तसेच यापुढेही करत राहीन अशी मला आशा आहे."
"छावा' नंतर आता रश्मिका मंदाना 'सिकंदर' मध्ये दिसणार आहे. यामध्ये ती सलमान खानची हिरोईन आहे. या सिनेमासाठीही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.