साऊथसोबतच हिंदी इंडस्ट्रीही गाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna). तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. २०२१ साली आलेल्या 'पुष्पा' सिनेमामुळे तिचं नशीबच पालटलं. सिनेमातील 'श्रीवल्ली' या भूमिकेने तिला भरपूर लोकप्रियता मिळाली. यानंतर तिची बॉलिवूड एन्ट्रीही झाली. सध्या ती दोन्ही इंडस्ट्रीत आघाडीवर आहे. 'अॅनिमल' नंतर तर तिच्याकडे सिनेमांची रांगच लागली आहे. या सर्व व्यस्त शेड्युलमध्ये रश्मिकाला जिममध्ये गंभीर दुखापत झाली. तिचा पाय फ्रॅक्चर झाला असून नुकतीच ती हैदराबाद विमानतळावर व्हिलचेअरमध्ये दिसली.
इतर वेळी विमानतळावर पापाराझींकडे बघून गोड स्माईल देणारी रश्मिका आज वेगळी दिसली. पिंक चेक्स स्वेटशर्ट, ब्लू जीन्स, डोक्यावर हॅट आणि तोंडाला मास्क लावून ती कारमधून उतरली. समोरच ठेवलेल्या व्हीलचेअरवर जाण्यासाठी ती लंगडत लंगडत गेली. व्हिलचेअरवर बसल्यावर कॅमेऱ्याकडे न पाहता ती मान खाली घालून केवळ मोबाईलमध्येच पाहत होती. रश्मिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नेटकऱ्यांनी व्हिडिओवर 'ओव्हरअॅक्टिंग' अशी कमेंट केली आहे. तर चाहत्यांनी तिच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. रश्मिका आगामी 'छावा' सिनेमात दिसणार आहे. आज सिनेमाचा भव्य ट्रेलर लाँच होणार आहे. विकी कौशल सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
रश्मिका मंदाना सलमान खानसोबत 'सिकंदर' च्या शूटिंगमध्येही व्यस्त होती. याच वेळी तिच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे सिनेमाचं शूटही पुढे ढकललं. रश्मिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या आगामी सिनेमांच्या दिग्दर्शकांची माफीही मागितली.