Ratan Tata Passes Away : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दानशूर व दयाळू रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सामान्य लोकांपासून, राजकीय क्षेत्रातील मान्यवर ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी रतन टाटा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहलं, "एका युगाचा अंत झालाय. ते अतिशय आदरणीय आणि नम्र व्यक्ती होते. अफाट दूरदृष्टी आणि राष्ट्रासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करण्याचा त्यांचा निर्धार हा नेहमीच अभिमानास्पद. अनेक वेळा आम्ही काही प्रोजेक्ट्सवर एकत्र सहभागी होतो त्यांच्यासोबत अनेक अद्भुत क्षण घालवण्याची संधी मिळाली. आजचा खूप दुःखद दिवस", असं म्हणत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्यावर आज वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, अशी मागणी विविध स्तरावरुन होत आहे. आता राज्य मंत्रिमंडळात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.