Join us

'ॲक्टिंग स्कूल' म्हणजे दुकान, रत्ना पाठक शाह यांचं वक्तव्य; अनुपम खेर यांनी दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 4:12 PM

रत्ना पाठक शाह आणि अनुपम खेर यांच्यात शाब्दिक युद्ध

ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखल्या जातात. फिल्म इंडस्ट्री असो किंवा इतर सामाजिक विषय त्या नेहमीच आपली मतं मांडतात. नुकतंच त्यांनी अभिनय कार्यशाळांवर विधान केलंय जे चर्चेत आहे. 'अॅक्टिंग स्कूल्स'ला त्या दुकान म्हणाल्या आहेत. यावर अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher)  ज्यांचं स्वत:चं अॅक्टिंग स्कूल आहे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह यांनाच थेट प्रश्न केला आहे.

'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, "हा त्यांचा दृष्टिकोन आहे. मी नसीरची मुलाखत बघितली.ते सुद्धा असंच म्हणत होते. दोघंही खरंतर नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा(NSD) चे आहेत. मग एनएसडीलाही दुकान म्हणणार का? मला वाटतं काही काही वेळेस व्यक्ती जरा जास्तच फिलॉसॉफिकल होण्याचा प्रयत्न करतो. जर त्यांना वाटतं अॅक्टिंग स्कूल दुकान आहे तर ठिके मला काही अडचण नाही."

ते पुढे म्हणाले, "मी अभिनय कार्यशाळा सुरु केली जेणेकरुन मी विद्यार्थ्यांना अभिनयातले बारकावे शिकवेन. हे दुकान असल्याचं विधान करणाऱ्यांसाठी असं म्हणणं सोपं आहे. पत्रकारिताचा अभ्यास करण्यासाठी विद्यालय आहे, दंत चिकित्सालयसाठी विद्यालय आहे. रत्ना अशा डेंटिस्टकडे जाते का जो कधी शाळेतच गेला नसेल. मग जो प्रामाणिकपणे अभिनय कार्यशाळेत जात आहे त्या व्यक्तीबद्दल ती कशी बोलू शकते? मला खात्री आहे की ती माझ्या अभिनय कार्यशाळेबद्दल बोलत नाहीए. अनेकांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा सुरु केल्या आहेत. पण जे लोक अशा कार्यशाळा चालवतात त्यांना माहित आहे की हे किती  महत्वाचं आहे."

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडशाळा