बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यांच्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सामाजिक, राजकीय मुद्यांवर हे सेलिब्रिटी अगदी बिनधास्त बोलतात आणि अनेकदा यामुळे अडचणीतही येतात. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे यापैकीच एक. नसीरूद्दीन शाह कोणालाही न घाबरता आपले विचार मांडतात. गेल्या अनेक वर्षांत यामुळे त्यांनी अनेक वाद ओढवून घेतलेत. आता त्यांच्या या परखड स्वभावावर त्यांच्या पत्नी रत्ना पाठक (Ratna Pathak) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला भीती वाटते...सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत रत्ना पाठक भरभरून बोलल्या. नसीरूद्दीन शाह यांच्या स्पष्टवक्तेपणावरही त्या बोलत्या झाल्यात. त्या म्हणाल्या, मी नसीर यांना अनेकदा त्यांचे विचार मांडण्यापासून रोखते. कारण मला भीती वाटते. नसीर यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे एखाद्या दिवशी आमच्या घरावर दगड पडतील, अशी भीती मला वाटते. आजच्या जगात कुणाचा काहीही भरवसा नाही. कधीही दगड पडू शकतात. शिवाय आजच्या जगात काम मिळणंही कठीण झालं आहे. काम न मिळण्याची अनेक कारणं आहेत. त्यामुळे माझ्या मते प्रत्येकाला जबाबदार असण्याची गरज आहे. अर्थात शक्य असेल तर घाबरण्याची गरज नाही, असं रत्ना म्हणाल्या.
भीती वाटते पण... आजकाल कुठल्याही मुद्यावरून वाद उभे होतात. भीती वाटते. पण काय करणार? जगात कुठे काही चुकीचं सुरू असेल आणि त्यावर कुणी बोलणारच नसेल तर ती चूक कशी सुधारणार? आम्ही सगळे बोलणारे वेडे तर नक्कीच नाही. तशी आत्तापर्यंत नौका डुबलेली नाही. भविष्यात काय होतं, ते बघूच...., असंही त्या म्हणाल्या.
नसीरूद्दीन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, लवकरच ते ‘कुत्ते’ या सिनेमात दिसणार आहेत. अलीकडे या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज असे कलाकार आहेत.