Video : बोरिवलीमधील प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीला अभिनेत्री रवीना टंडनने लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 03:40 PM2018-09-03T15:40:30+5:302018-09-03T16:19:01+5:30
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने बोरिवलीमधील दंहीहंडीला नुकतीच उपस्थिती लावली. ही दहीहंडी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केली असून रवीनाने तिथे जाऊन गोविंदाचा उत्साह वाढवला.
देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी श्री कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा हा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला असून मथुरा, द्वारकेसह मुंबईतील इस्कॉन मंदिरात रात्रीपासून भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईतही गोपाळकाल्याचा उत्साह शिगेला पोहचला असून गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी आतुर झाली आहेत. अनेक थर लावून मोठमोठ्या दहीहंड्या गोविंदा फोडत आहेत. या गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक सेलिब्रेटी विविध मंडळांना हजेरी लावत आहेत. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळी या सणाच्या उत्साहात सामील झाली आहेत.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने बोरिवलीमधील दंहीहंडीला नुकतीच उपस्थिती लावली. ही दहीहंडी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केली असून रवीनाने तिथे जाऊन गोविंदाचा उत्साह वाढवला. यावेळी तिने अखियों से गोली मारे या गाण्यावर ताल धरला. तसेच तिने हा सण तिचा खूप आवडता असल्याचे तिथे आवर्जून सांगितले. तसेच या वेळी तिने काही प्रसारमाध्यांशी मराठीत देखील संवाद साधला. तिला मराठी नीट बोलता येत नसले तरी मराठी पूर्णपणे समजते असे तिने या वेळी सांगितले.
गेल्या २० ते २५ दिवसांपासून सुरू असलेला थरांचा सराव, प्रायोजकत्व मिळविण्यासाठीची धडपड, मोठ्या रकमेच्या हंड्या फोडण्याचा मानस, स्पर्धेसह तितकेच खेळीमेळीचे वातावरण आणि थरांवर थर रचण्यासाठी सुरू असलेला उत्साह; असे सारे काही ‘याची देही याची डोळा’ पाहण्याचा योग मुंबईकरांना आज मिळत आहे.
शहर आणि उपनगरात राजकीय हंड्यांपासून सामाजिक हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषत: थर रचण्यासाठीची स्पर्धा दिवसभर रंगणार असतानाच सुरक्षेची काळजी गोविंदांना घ्यावी लागणार आहे. आपल्या मंडळाच्या हंडीला सलामी देत घराबाहेर पडणारा गोविंदा ‘मच गया शोर सारी नगरी मे...’ म्हणत मुंबापुरीच्या उत्साहात भर टाकत आहे. विशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी, सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे. पण दुपारपर्यंत अनेक गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.