कालच अजय देवगणचा नवीन वर्षातील नवा सिनेमा 'आझाद'चा ट्रेलर लाँच झाला. या सिनेमातून रवीना टंडनची लेक राशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँच हटके पद्धतीने पार पडला. सिनेमात दिसणाऱ्या घोड्याला ट्रेलर लाँचमध्ये आणण्यात आलं. यावेळी रवीनाची लेक राशा थडानीने भगवद्गीतेचा संदर्भ देऊन केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आहे.
भगवद्गीतेचा उल्लेख करुन राशा काय म्हणाली?
'आझाद' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला राशा थडानीने मीडियाशी संवाद साधताना भगवद्गीतेचा खास संदर्भ सांगितला. राशा म्हणाली की, "माझ्या आईने मला एकदा सांगितलेलं. भगवद्गीतेत लिहिलंय की, तुम्ही फक्त खूप मेहनत करा. प्रत्येक कामात तुमचं बेस्ट द्या. पुढे जे काय होईल ते देवावर आहे. या इंडस्ट्रीत इमोशनल अटॅचमेंट खूप आहे. अतीविचार आणि अनिश्चितता खूप आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाचं ऐकत बसाल तर कायम चिंताग्रस्त राहाल. त्यामुळे तुम्ही खूप मेहनत करा, तुमचं बेस्ट द्या त्यानंतर देव सर्व काही नीट करेल."
राशाचे हे विचार करुन नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलंय. इतक्या कमी वयात एवढे चांगले विचार ऐकल्यावर नेटिझन्सने राशाचं कौतुक केलंय. "याला म्हणतात अभिनेत्री", "अभिनेत्री असावी तर अशी!" अशा शब्दात कमेंट्स करुन राशावर नेटिझन्सने प्रेमाचा वर्षाव केलाय. राशा-अमन-अजय देवगणचा या त्रिकुटाचा 'आझाद' सिनेमा १७ जानेवारीला संपूर्ण भारतातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे.