Join us  

'माझं रक्त खवळलं..', वसई हत्या प्रकरणाचा व्हिडीओ पाहून भडकली रवीना टंडन, म्हणाली...'लाज वाटली पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 12:41 PM

वसईतील गावराई पाडा येथे मंगळवार सकाळी थरकाप उडवणारी घटना घडली.

वसईतील गावराई पाडा येथे मंगळवार सकाळी थरकाप उडवणारी घटना घडली. भररस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे मुंबईसह उपनगरात खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सोशल मीडियावर या भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री रवीना टंडन हिने संंताप व्यक्त केला.  

रवीना टंडनने संतप्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिनं लिहलं, घटनास्थळी उभा असलेला प्रत्येकजण तिला सहज वाचवू शकला असता…लाज. कोणीही तिच्या मदतीला पुढं आलं नाही. हे पाहून माझे रक्त खवळलं. काहीवेळा लोकांनी फक्त लक्ष देणे आवश्यक असतं. जरी ते करण्यासाठी तुम्हाला स्वतःला धोका पत्करावा लागत असेल तरीही. त्याच्याकडे कोणतीही तीक्ष्ण वस्तू नव्हती. फक्त दोन लोकांच्या धैर्याची गरज होती. असे बदमाश हे भित्रे असतात. विरोध होताच ते पळून जातात. असे खोटारडे लोक हे खोट्याच्या मागे लपतात'.

दरम्यान, नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवलं आणि दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली.

 त्यावेळी रोहितनं आपल्याबरोबर आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली. याप्रकरणातील आरोपी रोहित यादवला अटक करण्यात आली आहे. शिवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :रवीना टंडनसेलिब्रिटीबॉलिवूडवसई