Join us

अक्षय कुमार-ट्विंकल खन्नासोबत संबंध जोडणा-यांना रवीना टंडनचे सणसणीत उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 9:44 AM

रवीना, तुझा इशारा मिसेस फनीबोन्सकडे (ट्विंकल खन्ना) तर नाही ना? असा थेट सवाल लोकांनी रवीनाला केला होता. आता रवीनाने याचे सणसणीत उत्तर दिले आहे.

तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादाच्या पार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक शोषणाविरोधात ट्विट करणारी रवीना टंडन जाम संतापली आहे. तिच्या या ट्विटचा संबंध लोकांनी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासोबत जोडला होता.आपल्या या ट्विटमध्ये रवीनाने पतीच्या चुका पदराआड लपवणा-या इंडस्ट्रीतील तमाम पत्नींवर निशाणा साधला होता. ‘वर्कप्लेस हरेसमेंट काय असते? इंडस्ट्रीतील सर्व बायका आणि गर्लफ्रेन्ड त्यांच्या डोळ्यांदेखत एखाद्या हिरोईनचे करिअर उद्धस्त होताना बघतात. पण हे बघूनही आपल्या पतीला वा बॉयफ्रेन्डला एका शब्दानेही बोलत नाहीत, अनेक अभिनेते स्वत:च्या मौजमज्जेसाठी कुण्या मुलीचे करिअर ध्वस्त करतांना एक क्षणही विचार करत नाहीत. लहान-सहान गोष्टींवरून हिरोईनला रिप्लेस केले जाते,’असे ट्विट रवीनाने केले होते.खरे तर आपल्या या ट्विटमध्ये रवीनाने कुणाचेच नाव घेतले नव्हते. पण  रवीनाने हे ट्विट करताच नेटक-यांनी त्याचा संबंध थेट अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासोबत जोडणे सुरू केले होते. (अक्षय कुमार व रवीना टंडन ही जोडी ९० च्या दशकातील सर्वात चर्चित जोडी होती. रवीना टंडनसोबत ब्रेकअप केल्यानंतरचं अक्षयने २००१ मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न केले होते.) रवीना तुझा इशारा मिसेस फनीबोन्सकडे (ट्विंकल खन्ना) तर नाही ना? असा थेट सवाल लोकांनी रवीनाला केला होता. आता रवीनाने याचे सणसणीत उत्तर दिले आहे. ‘काही लोक माझा भूतकाळ माहित नसताना माझा संबंध काही व्यक्तींशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझ्या आयुष्याबद्दल बोलत नव्हते. इंडस्ट्रीतील महिलांसोबत जे काही होते, त्याबद्दल मी बोलले होते. माझा कुणाकडेही रोख नव्हता,’ असे रवीनाने स्पष्ट केले आहे.

तूर्तास बॉलिवूडमध्ये तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वाद गाजतो आहे. २००८ मध्ये नाना पाटेकर यांनी ‘हॉर्न ओके प्लीज’या चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी गैरवर्तन केले होते, असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. तनुश्रीच्या आरोपानंतर बॉलिवूडच्या अनेकांनी तिला पाठींबा दिला आहे. रवीना टंडनही तनुश्रीच्या बाजूने मैदानात उतरली होती. ‘पुन्हा एकदा इंडस्ट्री आपल्याच लोकांना वाचवण्यात अपयशी ठरली. आपल्याला एक संधी मिळाली होती. पण आपण ती गमावली. इंडस्ट्री महिला सक्षमीकरणावर सिनेमे बनवते. पण ही शुद्ध फसवणूक आहे. तनुश्री प्रकरणात इंडस्ट्री ज्याप्रमाणे मूग गिळून गप्प आहे, त्यावरून तरी हेच दिसते,’ असे ट्विट रवीनाने केले होते.

टॅग्स :रवीना टंडनतनुश्री दत्तानाना पाटेकर