अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tondon) काल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 'नाटू नाटू' गाण्याचे संगीतकार ऑस्कर विजेते एमएम कीरावानी (MM Kirawani) यांना देखील पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. KGF 2 अभिनेत्री रवीना टंडनने 100 पेक्षा जास्त सिनेमांत काम केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी तिला हा पुरस्कार मिळाला.
तर एमएम कीरावानी यांनी देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले. सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार पटकावत त्यांनी देशाला जागतिक स्तरावर नेऊन पोहोचवले. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रवीनाने तीन वेळा राष्ट्र्पतींसमोर नतमस्तक होत आभार मानले. रवीना टंडन अभिनयाव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही सक्रिय असते.
रवीनाने सोहळ्यासाठी खास पारंपारिक लुकमध्ये हजेरी लावली. साडी, अंबाडा, त्यावर गजरा आणि कानात झुमके अशा लुकमध्ये ती सुंदर दिसत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना नमस्कार करुन पुरस्कार स्वीकारला.
पद्मश्री पुरस्कार घोषित होताच रवीनान भावना व्यक्त करत म्हणाली, 'मी सन्मानित आणि कृतज्ञ आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही. माझं आयुष्य, माझी आवड आणि उद्देश ज्याने मला केवळ बॉलिवूडच नव्हे, तर त्यापलीकडेही योगदान देता आले, त्याची दखल घेतल्याबद्दल भारत सरकारचे धन्यवाद. या प्रवासात ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे मी आभार मानते. यासाठी मी माझे वडील रवी टंडन यांची ऋणी आहे'.
बालहक्क, महिला सशक्तीकरण आणि शिक्षण यांसारख्या सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करते. कला, साहित्य, शिक्षण , सामाजिक कार्य, विज्ञान, अशा अनेक क्षेत्रात ती पुढाकार घेते. याचीच दखल घेत तिला पद्मश्री या प्रतिष्ठित पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.