अजय देवगणचा आज वाढदिवस असून त्याने फूल और काटे, हम दिल दे चुके सनम, जख्म, गंगाजल, गोलमाल सिरीज, सिंघम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याला त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या तानाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. अजयला आज बॉलिवू़डमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये एक मानले जाते.
अजयचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री काजोलसोबत झाले असून त्यांना युग आणि न्यासा अशी दोन मुलं आहेत. तुम्हाला माहीत आहे का, अजयचे एकेकाळी रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यासोबतचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. अजय आणि रवीनाने गैर, दिलवाले, एक ही रास्ता, जंग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्यात अनेक वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. पण अजयच्या आयुष्यात करिश्मा कपूर आल्यानंतर त्याने रवीनासोबत ब्रेकअप केले असे म्हटले जाते. अजयवर रवीना प्रचंड प्रेम करत होती. त्यामुळे अजय तिच्यापासून दूर गेलेला ती सहनच करू शकली नव्हती आणि तिने डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला असल्याचे नव्वदीच्या दशकात अनेक वर्तमानपत्रात आले होते.
ब्रेकअपनंतर अजय आणि रवीना हे एकमेकांचे अक्षरशः शत्रू बनले होते. रवीनाने अनेक मुलाखतींमध्ये अजय विरोधात आपले मत मांडले होते. अजयने तिला फसवले असल्याचे तिने म्हटले होते. त्यावर रवीनाला मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे अजयने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत देखील अजयने सांगितले होते. तो म्हणाला होता की, रवीनाला मी प्रेम पत्रं लिहिली असल्याचे तिने म्हटले आहे. अशी कोणतीच पत्रं मी लिहिलेली नाहीत. तिला वाटत असेल तर तिने ही पत्रं खुशाल छापावीत. माझे नाव घेऊन ती पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तिने आत्महत्येचा जो प्रयत्न केला, तोदेखील एक पब्लिसिटी स्टंटच होता.