बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिला अखेर माफी मागावी लागली. होय, नुकतीच रवीना, दिग्दर्शक व कोरिओग्राफर फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या तिघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. यांनंतर ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री रवीना टंडनने माफी मागितली आहे.‘ कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा. मी एकही असा शब्द असा वापरलेला नाही ज्यामुळे कोणत्याही धमार्चा अपमान होईल. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमच्या तिघींचाही हेतू नव्हता. पण आमच्यामुळे जर कोणाला यामुळे त्रास झाला असेल किंवा भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सर्वांची मनापासून माफी मागते,’ असे रवीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. सोबत संबधित एपिसोडची युट्यूब लिंक सुद्धा शेअर केली आहे.
काय आहे प्रकरण या प्रकरणाची सुरुवात झाली होती ती एका व्हिडीओमुळे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि रवीना, फराह आणि भारतीला तिथल्या लोकांची नाराजी ओढावून घ्यावी लागली. एका खासगी वेब व युट्यूब चॅनलसाठी बनवण्यात आलेल्या कॉमेडी प्रोग्राममध्ये या तिघींनी ख्रिश्चन धर्माशी निगडीत काही अपमानास्पद शब्दाचा प्रयोग केल्याचा आरोप आहे. ख्रिसमसच्या दिवशीच हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या प्रकारानंतर अमृतसरच्या अजनाला येथे ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी निदर्शने केली होती. यानंतर संबंधित व्हिडीओची तपासणी केल्यानंतर पंजाब पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. कलम 295-अ नुसार रवीना, फराह आणि भारती यांच्या विरोधात केस दाखल केली आहे.