बॉलिवूडची 'मस्त-मस्त' गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन (Raveena Tandon). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रवीनाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एकेकाळी रवीनाने अनेक सुपरहिट सिनेमाबॉलिवूडला दिले. यात तिची काही गाणी तुफान लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे ही गाणी आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने ऐकतात. 'टीप-टीप बरसा पानी', 'तू चीज बडी है मस्त मस्त' ही गाणी तर तुफान लोकप्रिय झाली. त्यामुळेच तिचा छैय्या छैय्या या गाजलेल्या गाण्याची ऑफर सुद्धा मिळाही होती. परंतु, तिने ही ऑफर धुडकावून लावली.
शाहरुख खानच्या 'दिल से' या सिनेमातील 'छैय्या छैय्या' हे गाणं त्या काळी प्रचंड गाजलं. इतकंच नाही तर आज सुद्धा ते लोकप्रिय आहे. या गाण्यात शाहरुखसोबत अभिनेत्री मलायका अरोरा झळकली आहे. मात्र, या गाण्याची पहिली ऑफर रवीनाला मिळाली होती. परंतु, क्षुल्लक कारण देत तिने ही ऑफर नाकारली. बीबीसी एशियन नेटवर्क पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं.
"त्यावेळी मी 'रक्षक' चित्रपटातील 'शेहर की लडकी' हे गाणं केलं होतं. हे गाणे हिट झाल्यानंतर मला सातत्याने आयटम साँग्सच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. यामध्येच मला छैय्या छैय्या हेदेखील ऑफर झालं. मला चांगलंच आठवतंय शाहरुख त्यावेळी मला म्हणाला होता की मणि सरांना तुझ्याशी बोलायचं आहे. तुझ्यासाठी त्यांच्याकडे एक गाणं आहे. त्यावेळी मी फार संभ्रमात पडले होते. कारण मणिरत्नम सरांसोबत काम करायला कोणाला आवडणार नाही? मला सुद्धा त्यांच्यासोबत काम करायचं होतं. पण, पुन्हा एकदा आयटम साँग करणं म्हणजे मग माझ्यावर तो ठपका बसला असता. त्यावेळी लोक टाइपकास्ट करायचे. त्यामुळे मी या गाण्याची ऑफर नाकारली", असं रवीनाने सांगितलं.
'माझ्यासोबत एक सिनेमा करा, तुमच्यासाठी विमानावर छैय्या-छैय्या करेन'; किंग खानची मणिरत्नमला विनंती
पुढे ती म्हणते, "ते गाणं गमावल्याचं मला दु:ख सुद्धा नाहीये. कारण, जर त्यावेळी मी ती ऑफर नाकारली नसती तर कदाचित आज हा इंटरव्ह्यू देत बसले नसते." दरम्यान, रवीना सध्या कर्मा कॉलिंग या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. आतापर्यंत या सीरिजचे ७ एपिसोड रिलीज झाले आहेत. या सीरिजमध्ये रवीनासोबत नम्रता सेठ, वरुण सूद, वालुस्चा डी सूसा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.