बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने (Akshay Kumar) ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलं. त्याने 'खिलाडी' ही आपली वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात अक्षयचे जितके सिनेमे चांगले तितकंच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा झाली. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. यामध्ये शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन यांच्यासोबतचं त्याचं अफेअर कायम चर्चेचा विषय ठरलं. आता प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. सगळं विसरुन रविना टंडन (Raveena Tondon) आणि अक्षय कुमार लवकरच एकत्र काम करणार आहेत.
अक्षय कुमारच्या आगामी 'वेलकम 3' सिनेमाची नुकतीच घोषणा झाली आहे. 'वेलकम टू जंगल' असं सिनेमाचं नाव आहे. वेलकम १ चांगलाच गाजला होता. तर 'वेलकम 2' फारसा चालला नाही. यामध्ये जॉन अब्राहमने मुख्य भूमिका साकारली होती. तर आता वेलकम ३ मध्ये अक्षय कुमार कमबॅक करत आहे. सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी फिरोज नाडियादवाला यांनी घेतली आहे. तिसऱ्या भागासाठी रवीना टंडनला विचारण्यात आलं अशी चर्चा आहे. रवीनाने होकार दिला तर बऱ्याच वर्षांनी अक्षय-रवीनाची जोडी मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल. नाना पाटेकर आणि अनिल कपूर मात्र या सिनेमाचा भाग नसतील. यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अक्षय आणि रवीना यांच्या नात्याचा मोठा इतिहासच आहे. दोघांचं नातं अगदी लग्नापर्यंत गेलं होतं. १९९४ साली आलेल्या 'मोहरा' सिनेमात दोघं झळकले. तेव्हापासून त्यांनी डेट करायला सुरुवात केली. बराच काळ डेट केल्यानंतर त्यांनी साखरपुडा केल्याचीही चर्चा होती. लग्नापर्यंत चर्चा गेली असताना त्याच्याआधीच लग्न तुटल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर दोघांनी कधीच एकमेकांसोबत काम केलं नाही. आता ते एकत्र आले तर चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. 2024 साली 'वेलकम 3' प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.