रवि किशन यांचा आज वाढदिवस असून त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.
रवि किशन यांचा जन्म १७ जुलै, १९६९मध्ये जौनपूरमध्ये झाला आहे. त्यांनी भोजपुरी चित्रपटात काम करून लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर मुंबईत रवाना झाले. त्यांनी बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. रवि किशन यांना तेरे नाम चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच २००५ साली भोजपुरी चित्रपट 'कब होई गवनवा हमार'ला राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
रवि किशन यांना आता जे काही आहे ते मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, चित्रपटात काम न मिळाल्यामुळे एकेदिवशी ते वाईट मार्गाचा अवलंब करणार होते. पण त्यावेळी वडिलांनी रोखले. माझ्या स्ट्रगलिंग काळात मला कुणीच मदत केली नाही. मला आठवतंय की माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा तिला रुग्णालयातून घरी आणण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्यावेळी व्याजाने पैसे घेऊन पत्नी व मुलीला हॉस्पिटलमधून सोडवलं होतं. त्यासाठी शेत गहाण ठेवावं लागलं होतं.
सर्वात वाईट परिस्थितीबद्दल त्यांनी सांगितलं की, एकदा भर पावसात भिजत मी रेकॉर्डिंग स्टुडिओला पोहचलो होते. ७ ते ८ तास रेकॉर्डिंग करून बाहेर पडताना मी चेक मागितला. त्यावर निर्माता म्हणाला की, चित्रपटात काम दिलं ते काय कमी आहे. चेक मागू नकोस नाहीतर तुझी भूमिका कट करून टाकेन. हे ऐकल्यावर मी हैराण झालो होतो. मला गहाण ठेवलेली जमीन सोडवायची होती. मी बाईकवर बसून पावसात भिजत परत आलो आणि आकाशाकडे पाहत खूप रडलो. हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही.
रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत.