भोजपुरी आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवलेले अभिनेता रवी किशन 'लापता लेडीज' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. लापता लेडीज सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. अशाच एका मुलाखतीत रवी किशन यांनी त्यांच्या वडिलांबाबतच्या नात्यावर भाष्य केलं. रवी किशन यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करणं हे त्यांच्या वडिलांना मान्य नव्हतं. त्यामुळेच त्यांच्या नात्यातही तणाव निर्माण झाला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं.
रवी किशन यांनी अभिनय करण्याला वडिलांचा विरोध होता. जेव्हा त्यांनी रामलीलामध्ये भाग घेतला होता. तेव्हा अभिनय केला म्हणून त्यांना वडिलांनी शिक्षा दिली होती. पण दिवसेंदिवस या गोष्टी वाढत गेल्या. त्यामुळे वडिलांचा राग आणि मारहाणीला कंटाळून त्यांनी १७व्या वर्षी घर सोडलं. केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या रवी किशन यांनी अभिनयकौशल्याने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. वडिलांबाबतच्या नात्याबद्दल ब्रुटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "माझे वडील मला खूप मारायचे. ते मला हातोड्याने मारत होते. त्यांना मला मारुन टाकायचं होतं. आणि माझ्या आईला माहीत होतं की ते मला मारून टाकू शकतात. याबद्दल त्यांना काही वाटणारही नाही. कारण, पुजाऱ्यांना भावना नसतात. म्हणून माझ्या आईने मला पळून जाण्यास सांगितलं."
"माझे वडील एक पुजारी होते. त्यामुळे त्यांनी कधी विचार केला नव्हता की त्यांच्या घरात कलाकार जन्माला येईल. त्यांना त्यांच्या मुलाने योग्य रस्ता निवडावा असं वाटतं होतं." असंही पुढे रवी किशन म्हणाले. पण, आता रवी किशन यांनी सिनेइंडस्ट्रीत सक्सेस मिळवल्यानंतर त्यांचे वडील खूश आहेत. त्यांना आता मुलाचा अभिमान आहे, असंही रवी किशन यांनी सांगितलं.