नवे वर्ष अभिनेते व खासदार रवी किशन यांच्यासाठी दु:खद बातमी घेऊन आले. काल रात्री रवी किशन यांचे वडील पंडित श्यामनारायण शुक्ला यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. श्यामनारायण शुक्ला दीर्घकाळापासून आजारी होते. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले होते. वाराणसीत देह त्याग करण्याची त्यांची अंतिम इच्छा होती. त्यानुसार 15 दिवसांपूर्वी त्यांना वाराणसीत हलविण्यात आले होते. याचठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. काल 31 डिसेंबरला रात्री 11 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. श्याम नारायण हे भगवान शिवाचे मोठे भक्त होते. त्यामुळे त्यांनी वाराणसीत देहत्यागाची अंतिम इच्छा व्यक्त केली होती.
मुलाने डेअरीचा व्यवसाय सांभाळावा अशी रवी किशन यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र आईने रवी किशन यांना 500 रूपये दिले आणि रवी किशन जौनपूरवरून मुंबईला आलेत. एका मुलाखतीत रवी किशन वडिलांबद्दल भरभरून बोलले होते. माझे वडील लहानपणी मला खूप मारायचे. पण त्यांनी मला मार दिला नसता तर मी एक व्यसनी गुंड बनलो असतो. वडिलांनी मला रात्री लवकर झोपण्याची आणि पहाटे लवकर उठण्याची शिस्त लावली. आजही ती शिस्त कायम आहे. माझे वडिल पुजारी होते. त्यामुळे मला आध्यात्माची गोडी लागली, असे त्यांनी सांगितले होते.