नववर्षाच्या पूर्वसंध्येला बेंगळुरुत महिलांची छेड काढण्यात आल्याची घटना ताजी असतानाच त्याच दिवशी रात्री उशीरा भररस्त्यात एक तरूणीचा विनयभंग करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि देशभरात संतापाची लाट उसळली. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार तसेच सलमान खानचे वडिल सलीम खान आदींनी या घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. बेंगळुरूमधील घटना लज्जास्पद आहे. अशा घटना वाचल्या, ऐकल्या की मला लाज वाटते, अशी संतप्त प्रतिक्रिया आमिर खानने दिली आहे. अक्षयनेही, आज मला एक माणून म्हणवून घ्यायला लाज वाटतेय, अशा शब्दांत या घटनेबद्दलचा राग बोलून दाखवला आहे. पूर्व बंगळुरुमधील कम्मनहालीमध्ये ही घटना घडली आहे. नराधमांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला दुचाकीवरुन आलेले दोन तरुण त्या तरुणीच्या बाजूने गाडी नेतात. यानंतर पुन्हा मागे येऊन तरुणीपासून काही अंतरावर थांबतात. तरुणी जवळ येताच यातील एका नराधमाने तिला पकडले आणि तिचा विनयभंग केला. यानंतर त्या तरुणीला ढकलून देत दोघांनीही तिथून पळ काढला.
आमिर, अक्षय आणि सलीम खान या घटनेबद्दल काय म्हणाले, हे वाचा त्यांच्याच शब्दांत...हे सगळेच लाजीरवाणे- आमिर खान‘बेंगळुरात नववर्षांच्या पूर्वसंध्येला घटलेल्या छेडखानीच्या घटना दुर्दैवी आहेत. अशा घटना आपल्या देशात घडतात, याचेच दु:ख वाटते. अशा घटना थांबायच्या तर अनेक प्रकारच्या उपाय योजना कराव्या लागतील. कुठल्या एका कायद्याने या घटना थांबणा-या नाहीत. अशा घटना थांबवण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे. वेगाने न्याय देण्याची गरज आहे. अमेरिकेसारख्या देशात अशी घटना घडली तर तीन महिन्यांत त्याचा निकाल लागतो. आपले कोण काय बिघडवणार, असे काही विकृत लोकांना वाटते. यामुळे त्यांचे धाडस वाढते. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आपल्याला वेगाने पाऊले उचलावी लागतील.’
अशांनी स्वत:ला मानवप्राणीच समजू नये - अक्षय कुमार ‘बेंगळुरातील विनयभंगाची घटना लज्जास्पद आहे. खरे सांगायचे तर मला आता एक माणूस म्हणूनही लाज वाटतेय. सुट्टीचा आनंद घेऊन परतत असताना या बातमीवर माझे लक्ष गेले. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेची दृश्ये पाहून मला प्रचंड संताप आला. जो समाज महिलांचा आदर करू श्कत नाही, त्यांनी स्वत:ला मानवप्राणीच समजू नये. किंबहुना त्यांना तसा हक्कच नाही.’
मोदीजी काहीतरी करा- सलीम खान ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्ही म्हणता की,भारतातील युवा देशाला पुढे नेतील. बेंगळुरूमधील युवकांनी जे केले ते लज्जास्पद आहे. अशा घटना वारंवार होत आहे. आम्ही पण कधीकाळी युवा होतो. पण अशा गोष्टी कधीच झाल्या नाहीत.’
पाहा : बेंगळुरातील त्या लाजीरवाण्या घटनेचा व्हिडिओ...