अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सूर्यवंशी’ ( Sooryavanshi ) गेल्या 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आणि या बॉक्स ऑफिसची ‘रौनक’ पुन्हा परतली. चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्यात आणि बघता बघता चित्रपटाने 150 कोटी रूपयांहून अधिकची कमाई केली. रोहित शेट्टीची स्टाईल आणि अक्षय कुमारच्या अॅक्टिंगने प्रेक्षकांना जणू वेड लावलं. अक्कीनं साकारलेला डीसीपी वीर सूर्यवंशी पाहून चाहते भारावलेत. या भूमिकेत त्यानं असा काही जीव ओतला की, पाहून सगळ्यांनीच दाद दिली. पण ही भूमिका साकारण्यासाठी अक्षयने कोणत्या पोलीस अधिका-याकडून प्रेरणा घेतली, हे तुम्हाला माहित आहे का? तर या पोलिस अधिका-याचे नाव आहे विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil).
होय, मुंबई शहराचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून प्रेरणा घेत अक्षयने डीसीपी वीर सूर्यवंशी रंगवला. खुद्द अक्षयनेच हा खुलासा केला.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय यावर बोलला. तो म्हणाला, ‘विश्वास नांगरे पाटील हेच माझ्या डोळ्यासमोर होते आणि सूर्यवंशी या चित्रपटासाठी तेच माझे प्रेरणास्थान होते. मी त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यासारख्या अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकाºयाला डोळ्यांसमोर ठेऊनच मी सूर्यवंशीमधील पोलिस अधिका-यांची भूमिका साकारली. विश्वास नांगरे पाटील बाहेरून कठोर वाटत असले तरी मनाने अतिशय प्रेमळ आहेत. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आहेत. कोव्हिड महामारीच्या काळातील त्यांचं काम सर्वांनीच बघितलं. त्यांच्यासारख्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ शिवाय तंदूरूस्त पोलिस अधिकाºयाशिवाय माझा दुसरा कोणी रोल मॉडेल असूच शकत नाही,’ असं तो म्हणाला.
विश्वास नांगरे पाटील यांना धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखलं जातं. अनेक तरुण त्यांना आपला आदर्श मानतात. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारे अनेक तरुण विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. मूळचे सांगली जिल्ह्याचे असणारे विश्वास नांगरे पाटील यांनी खडतर प्रवास करत यश मिळवलं आहे. 26/11 रोजी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये दहशतवादी घुसले असताना जीवाची पर्वा न करता आत शिरलेल्या जिगरबाज पोलीसांमध्ये नांगरे पाटीलही होते. 2015 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले.