कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेल्या 'चंदू चँपियन' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. आजच या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिव्हिल झालंय. या सिनेमात कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत झळकतोय. कार्तिक आर्यनच्या जबरदस्त लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय. कार्तिक आर्यन या सिनेमात मराठमोळे पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते आणि भारतीय सैन्याचे अधिकारी मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारत आहे. कोण होते मुरलीकांत पेटकर? त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे.
कोण होते मुरलीकांत पेटकर?
मुरलीकांत पेटकर हे भारतीय सेनेतील एक अधिकारी होते. त्यांनी १९६५ साली झालेल्या भारत - पाकिस्तान युद्धात ९ गोळ्या झेलल्या होत्या. ९ गोळ्या लागल्याने पुढे मुरलीकांत यांना चालणं कठीण होऊ लागलं. त्यामुळे त्यांना अपंगत्व आलं. यामुळे निराश आणि खचून गेलेल्या मुरलीकांत यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता.
भारतासाठी जिंकलं पहिलं सुवर्णपदक
पण पुढे मात्र त्यांनी नाउमेद न होता पुढे त्यांनी आलेल्या शारीरिक व्याधींचा सामना करायचं ठरवलं. मग त्यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भाग घेतला. १९७२ साली या स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकलं. पुढे त्यांनी देशासाठी तब्बल १२७ सुवर्णपदकं जिंकली. याच जिगरबाज मुरलीकांत पेटकर यांची भूमिका कार्तिक आर्यन साकारत आहे. कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. १४ जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे.