या कारणामुळे मनोज वाजपेयीच्या डोक्यात घोळत होता आत्महत्येचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 5:51 AM
मनोज वाजपेयीने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. आज बॉलिवूडमधील दर्जेदार अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याचे ...
मनोज वाजपेयीने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. आज बॉलिवूडमधील दर्जेदार अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याचे सगळेच चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. मनोजला सत्या या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेली भिकू म्हात्रे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. या चित्रपटानंतर मनोजने कधीच मागे वळून पाहिले नाही. मनोज हा बिहारमधील एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. मनोजला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण त्यावेळी त्याच्या निर्णयाची सगळ्यांनीच खिल्ली उडवली होती. मनोजचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण बिहारमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला. दिल्लीत शिक्षण घेत असताना त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाविषयी समजले. दिल्लीत राहाण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. त्याला केवळ ३०० रुपयांत दिल्लीसारख्या महागड्या शहरात उदरनिर्वाह करावा लागत असे. त्यासाठी १५० रुपये त्याला घरातील लोक देत असे तर नुक्कड नाटकांमधून काम करून त्याला काही रक्कम मिळत असे. या पैशातून तो दिल्लीत राहात होता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवायचा हेच एक ध्येय त्याने डोळ्यासमोर ठेवले होते. पण चार वर्षं होऊनही त्याला काही तिथे प्रवेश मिळाला नाही. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळत नाही या गोष्टीचा त्याच्या मनावर गंभीर परिणाम झाला होता. तो त्या काळात डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने आत्महत्येचा देखील विचार केला होता. मात्र मित्रांनी समजवल्यानंतर त्याने हा विचार बदलला. मनोजने त्यानंतर काही नाटकांमध्ये देखील काम केले. त्यानंतर मनोजला स्वाभिमान या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ही मालिका त्या काळात चांगलीच गाजली होती. या चित्रपटानंतर दस्तक, दौड यांसारख्या चित्रपटात मनोजला छोट्या मोठ्या भूमिका साकारायला मिळाल्या. या भूमिकांनी मनोजला ओळख मिळवून दिली. पण सत्या या चित्रपटाने त्याचे संपूर्ण नशीबच बदलले. Also Read : मनोज वाजपेयीच्या वाट्याला आला प्रचंड संघर्ष! पहिल्या पत्नीने सोडली होती साथ!!