'गँग्स ऑफ वासेपूर' आणि 'फुकरे' या सिनेमातून आपले बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रिचा चड्ढा नेहमी सोशल मीडियावर तिच्या वक्तव्यामुळे ट्रोल होत असते. लवकरच ती बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. 1991 मध्ये सिल्क स्मितासोबत 'प्लेगर्ल्स' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री शकीला खान हिच्या आयुष्यावर बायोपिक येत आहे. त्यात तिची भूमिका रिचा साकारणार आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी रिचाने नुकतीच बंगळुरूमध्ये जाऊन शकीलाची भेट घेतली.
शकीलाला साऊथच्या अॅडल्ट चित्रपटांची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी रिचाने बंगळूरुमध्ये शकीलाची भेट घेतली. या भेटीत शकीलाने रिचाला तिच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्या दोघींनी बराच वेळ चर्चा केली. या चित्रपटाचे चित्रीकरण कर्नाटकच्या छोट्याशा गावातून सुरु होणार आहे. त्या गावाचे नाव तीर्थहल्ली असे आहे. सध्या रिचा या गावातच थांबली आहे आणि तिथेच चित्रपटाची तयारी करत आहे. या बायोपिकची निर्मिती इंद्रजित लंकेश करणार आहेत. 2019 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.शकीलाने चित्रपटसृष्टीपासून आता संन्यास घेतला आहे. मात्र 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये तिला दीपिका पदुकोणच्या आईची भूमिका ऑफर झाली होती. या भूमिकेसाठी तिला रोहित शेट्टीने नाही तर त्याच्या टीमने विचारले होते आणि या भूमिकेसाठी तिला फक्त 25 हजार रुपये दिले जाणार होते. त्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला होता.शकीला खानचा जीवनप्रवास पाहण्यासाठी रसिक उत्सुक असून रिचा शकीलाची भूमिका रुपेरी पडद्यावर कशी साकारते, हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.