'तांडव' सीरिजमुळे पुन्हा पतौडी पॅलेस चर्चेत आला आहे. हा पॅलेस इतका आलिशान आणि भव्य आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. म्हणून 'तांडव' या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये सैफच्या घरावरच साऱ्यांची नजर खिळून राहते.
पतौडी पॅलेसमध्ये पूर्वीही अनेक बड्या बॅनर सिनेमाचे शूटिंग झाले आहे. मात्र आता पुन्हा एकदा या पॅलेसमध्ये शूटिंग झाल्यामुळे वेगळ्याच गोष्टींचे तर्क वितर्क लावले जात आहेत.
यावर दिलेल्या मुलाखतीत सैफने यामागचे कारणही सांगितले आहे. 'तांडव' साठी हवे असणारे लोकेशन भव्य असावे अशी कथेची गरज होती. पतौडी पॅलेस मुळात खूप आलिशान आहे. त्यामुळे पॅलेसमध्ये शूटिंगसाठी परवानगी दिली होती. दुसरे म्हणजे ३४० दिवस तर पॅलस बंदच असतो. पहिल्यादाच तांडवसाठी पॅलेसच्या आतून शूटिंगसाठी परवानगी दिली होती.एरव्ही फक्त पॅलेस बाहेरील जागाच शूटसाठी दिली जाते.
नवाब पतौडी घराण्याची ही निशाणी असलेला हा आलिशान महल ८४ वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मन्सूर अली खान पतौडी अर्थात टायगर पतौडी यांचे वडील आणि छोटे नवाब सैफ अली खानचे आजोबा इफ्तिकार अली हुसेन यांनी १९३५ मध्ये हा आलिशान पॅलेस बांधला. इफ्तिकार अली हुसेन हे पतौडी घराण्याचे आठवे नवाब आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते.
इफ्तिकार अली हुसेन यांच्यानंतर नवाब घराण्याचे नववे नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी परदेशी आर्किटेक्टच्या मदतीने पतौडी पॅलेसला आकर्षक डिझाईन केली. ऑस्टेलियाचे आर्किटेक्ट कार्ल मोल्ट हेंज यांच्या संकल्पनेतून या भव्य आणि आलिशान महालाची डिझाइन करण्यात आली. टायगर पतौडी यांच्या पश्चात छोटे नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी बेगम करीना कपूर खान हे या महालाची देखभाल करतात. पतौडी पॅलेसला इब्राहिम कोठी असंही म्हटलं जातं.
मध्यंतरी पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकले जाणार असल्याच्याही वावड्या उठल्या होत्या.मात्र यावरही सैफने स्पष्टीकरण देत म्हटले होते की, 'पतौडी पॅलेस कधीच विकला जाऊ शकत नाही. पैशांमध्ये याचं मुल्यमापण करणे हे अशक्यच आहे. सैफच्या वडिलांच्या निधनानंतर काही हॉटेल मालकांनी पॅलेसरुपी हॉटेल चालवण्याची जबाबदारी घेतली होती. हाच पॅलेस परत मिळवण्यासाठी सैफला भारी भक्कम रक्कमही मोजावी लागली होती.