नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’बद्दल एक निराशाजनक बातमी आहे.नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी सिनेमा 'झुंड' सिनेमाच्या प्रदर्शनावर तेलंगणा उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार देश-विदेश किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकणार नाही. फुटबॉलपटू अखिलेश पॉल यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्याचे हक्क नंदी कुमार यांनी विकत घेतले होते. झुंडमधून विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित सिनेमात ही कथा दाखवण्यात आल्यामुळे कॉपीराईट हक्काचा भंग झाल्याची तक्रार नंदी कुमार यांनी दाखल केली होती. कॉपीराईट उल्लंघन केल्यामुळे सिनेमावर तेलंगणा उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. ‘झुंड’च्या निर्मात्यांनी माझी फसवणूक केली. माझ्यावर दबाव आणला, असा आरोपही नंदी कुमार यांनी केला होता.
सुरूवातीला अमिताभ बच्चन यांनी 'झुंड' हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. शूटिंग दरम्यानच अमिताभ यांनी सिनेमाकडे पाठ फिरवली होती. केवळ आमिर खानच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन यांनी सिनेमात काम करण्यास तयार झाले होते. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारली आहे.
या सिनेमाच्या शूटिंगवेळी अनेक अडचणी आल्या. सतत शूटिंगच्या तारखांमध्ये बदल होत होता यामुळे अमिताभ यांचे कामाचे शेड्युअलही बिघडत होते. त्यामुळे अमिताभ यांनी हा सिनेमा करणार नसल्याचे नागराज मंजुळेला कळवले होते. निर्मात्यांकडून घेतलेले मानधनही अमिताभ यांनी परत केले होते. अमिताभ यांना परत सिनेमात आणण्यासाठी आमिर खानला मध्यस्ती करावी लागली होती.
झुंड सिनेमा 8 मे रोजी रिलीज होणार होता. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला हिंदी सिनेमा असल्यामुळे चाहतेही सिनेमाची आतुरतेने वट पाहात होते. मात्र वादाच्या भोव-यात अडकलेला 'झुंड' पाहण्यासाठी रसिकांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की.