दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या लग्नाची बातमी नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सना दिली आहे. १४ व १५ नोव्हेंबर या दिवशी त्यांचे लग्न आणि लग्नाच्या आधीचे विधी पार पडणार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, रणवीर आणि दीपिकाने १५ नोव्हेंबरला लग्न करण्यामागे एक खास कारण आहे.
रणवीर आणि दीपिका यांनी दोघांनी सर्वप्रथम गोलियों की रासलीला-रामलीला या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानंतर त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्या दोघांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांचा गलियों की रासलीला-रामलीला हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटामुळे त्या दोघांची मैत्री झाली आणि त्यामुळे त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी लग्न करण्याचे ठरवले आहे.
रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाला आता अवघा एक महिना बाकी आहे. त्या दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून लग्नसोहळ्यात कोणतीही कमतरता येऊ नये यासाठी दोन्ही कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. त्यांचे लग्न इटलीत होणार असून सगळे कार्यक्रम हे तिथेच होणार आहेत. लग्न हे प्रचंड धुमधडाक्यात होणार असून मीडियाला लग्नापासून दूर ठेवले जाणार आहे.
२१ आॅक्टोबरला खुद्द दीपिका व रणवीरने आपल्या लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली. ‘आमच्या कुटुंबाच्या आशीर्वादाने आमचे लग्न १४ व १५ नोव्हेंबर २०१८ रोजी होत आहे. आमच्या या सुंदर प्रवासासाठी आपल्या आशीर्वादाची कामना करतो,’असे दीपिका व रणवीरने सोशल मीडियावर केलेल्या लग्नाच्या घोषणेत म्हटले आहे.
रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते.