मराठीसह हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारी दिवंगत अभिनेत्री म्हणजे रिमा लागू (reema lagoo). आज त्यांचं निधन होऊन बराच काळ लोटला मात्र, त्यांचे सिनेमा आजही गाजतात. रिमा लागू यांनी २५ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. यात बऱ्याचदा त्यांच्या वाट्याला प्रेमळ आईची भूमिका आली. मैंने प्यार किया या सिनेमामध्येही त्यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. परंतु, या सिनेमासाठी त्यांनी अत्यंत किरकोळ मानधन घेतलं होतं. मात्र, सिनेमा संपल्यावर अशी गोष्ट घडली ज्यामुळे सूरज बडजात्या यांनी रिमा लागू यांना मानधनाच्या दुप्पट रक्कम दिली.
सूरज बडजात्या यांच्या 'मैंने प्यार किया' या सिनेमात रिमा लागू यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. हा सिनेमा रिमा लागू यांना ऑफर झाला त्यावेळी सूरज बडजात्या यांनी त्यांना किती मानधन घेणार? असा प्रश्न विचारला होता. त्याकाळी मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये असा प्रश्न कोणीच विचारत नव्हते. त्यामुळे सूरज यांना काय सांगावं हा प्रश्न रिमा लागू यांना पडला होता. अखेर खूप विचार केल्यानंतर त्यांनी २१ हजार रुपये अशी मानधनाची रक्कम सांगितली.
रिमा लागू यांच्या मानधनात या कारणामुळे झाली वाढ
रिमा लागू यांनी २१ हजार रुपये सांगितल्यानंतर सिनेमाच्या संपूर्ण टीमला आश्चर्य वाटला. त्यांच्यासाठी हा आकडा खूप कमी होता. मात्र, रिमा यांच्या अभिनयाची ताकद, त्यांची मेहनत याचा सगळा अंदाज सूरज बडजात्या यांना होता. त्यामुळे सिनेमा झाल्यानंतर सूरज यांनी रिमा यांना ठरलेल्या मानधनाच्या कित्येक पटीने जास्त रक्कम दिली.