आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला होता. बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. पण त्यांना प्रेमळ आईच्या भूमिकेने वेगळी ओळख मिळवून दिली. मराठीच्या बरोबरीने हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये भक्कम पाय रोऊन उभे राहणाऱ्या मोजक्या मराठी अभिनेत्रींमध्ये त्यांचा समावेश होत होता. त्यांचे निधन १८ मे २०१७ ला हृदय विकाराच्या झटक्याने झाले.
रिमा लागू यांच्याबाबत एक खास गोष्ट तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. मैंने प्यार किया या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या चित्रपटातील सलमान खान आणि भाग्यश्रीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्याचसोबत या चित्रपटात सलमानच्या आईच्या भूमिकेत असलेल्या रिमा लागू यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाच्या वेळी रिमा लागू यांचे वय काय होते हे तुम्हाला कळल्यानंतर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
मैंने प्यार किया या चित्रपटामुळे रिमा लागू यांच्या करियरला एक वेगळीच दिशा मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट होता. या चित्रपटातील भूमिकेला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना हिंदीत अनेक चांगल्या भूमिका साकारायला मिळाल्या आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
मैंने प्यार किया या चित्रपटाच्याबाबतीत रिमा लागू यांनी एक खास गोष्ट लोकमतला अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. त्यांनी सांगितले होते की, मैंने प्यार किया या चित्रपटासाठी माझी निवड झाल्यानंतर मला खूप टेन्शन आले होते. कारण या चित्रपटाच्या वेळी माझे वय जेमतेम 30-35 होते. माझ्या आणि सलमानच्या वयात सात-आठ वर्षांचेच अंतर होते. त्यामुळे मी त्याच्या आईच्या भूमिकेत शोभेल की नाही हा मला प्रश्न पडला होता. माझे वय वाढवण्यासाठी माझे केस रंगवले जाणार याची मला खात्री होती. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी तसे काहीच केले नाही. त्यांनी केवळ मला एक वेगळा पण छानसा गेटअप दिला आणि तो प्रेक्षकांना देखील आवडला.