आपल्या अभिनयाने आणि अभिजात सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणा-या बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha )यांचा आज वाढदिवस. रेखा यांचं आयुष्य म्हणजे एक आख्यायिका म्हणायला हरकत नाही. त्यांच्या अभिनयाची जितकी चर्चा झाली,तितकीच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा झाली. पण आजतागायत रेखा नावाचं कोडं कुणालाच पूर्णपणे उलगडलेलं नाही. (Rekha Birthday)
संघर्ष हा रेखा यांच्या जीवनात बालपणापासूनच होता. मात्र प्रत्येक परिस्थितीवर त्यांनी यशस्वीपणे मात केली. त्यांच्या सुरुवातीला सावळ्या रंगामुळे निर्माते त्यांना संधी द्यायला तयार नव्हते. मात्र तरीही रेखा यांनी हार मानली नाही. स्वत:मध्ये बदल घडवत त्यांनी ‘दो अंजाने’ सिनेमातून दमदार एंट्री केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. गेल्या काही वर्षांपासून रेखा यांनी सिनेमात काम केलेले नाही. पण त्यांचा राजेशाही थाट बघताना प्रत्येकजण थक्क होतो. अशात त्यांच्या कमाईचे साधन काय? असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. आज याबद्दलच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सोशल मीडिया व काही वेबसाईट्च्या रिपोर्टनुसार, सदाबहार रेखा एकूण 40 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 25 अब्ज रूपयांच्या संपत्तीच्या मालकीण (Rekha Net Worth)आहेत. म्हणायला, अलीकडे त्या सिनेमात सक्रीय नाहीत पण तरीही वर्षाला त्या सुमारे 65 लाख रूपये कमावतात. वांद्रे भागात त्यांचा अलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. रेखा यांना आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे Land Rover Discovery, BMW 3 Series, Mitsubishi Outlander, Tata Nexa या महागड्या गाड्या आहेत.
सध्याचा त्यांचा इन्कम सोर्स काय, तर अनेक पुरस्कार सोहळे, टीव्ही शो, उदघाटन कार्यक्रमासाठी त्या गलेलठ्ठ मानधन घेतात.तुम्हाला आठवत असेलच की, अलीकडे रेखा यांनी ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेचा प्रोमो शूट केला होता. या प्रोमोतील 1 मिनिटांच्या शॉटसाठी रेखा यांनी सुमारे 5 ते 7 कोटी रूपये मानधन घेतल्याची चर्चा होती. बिग बॉस 15 साठी रेखा यांच्या आवाजातील सुरूवातीचे प्रोमो सुपरहिट झाले होते. या प्रोमोत रेखा यांचा आवाज होता. यासाठीही त्यांनी कोट्यवधीचे मानधन घेतल्याचे कळते.