रेखा...! बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री. आज इतक्या वर्षानंतरही तिचं स्टारडम कमी झालेलं नाही. आजही ती जिथे जाते तिच्या भोवती कॅमेऱ्यांची गर्दी होते. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात. रेखा (Rekha) चित्रपटसृष्टीत आली तेव्हा दक्षिणेतून आलेली भानुरेखा यापलीकडे तिची फार ओळख नव्हती. म्हणायला, रेखाचे वडील जेमिनी गणेशन तामिळ इंडस्ट्रीचे सुपरस्टार होते. पण व्यक्तिगत आयुष्यामुळे घर सांभाळण्याची जबाबदारी रेखावर अगदी लहानपणीच आली.
चौदा वर्षांची असताना तिला हिरोईन म्हणून काम करण्याची ऑफर आली ती कन्नड सिनेमाची. हा सिनेमा हिट झाला आणि पाठोपाठ तिला हिंदी सिनेमाही मिळाला. वयाच्या 15-16 व्या वर्षी रेखा मुंबईत आली ती या सिनेमाच्या शूटींगसाठी. सिनेमाचं नाव होतं, ‘अंजाना सफर’ (Anjana Safar) . या पहिल्यावहिल्या हिंदी सिनेमाच्या सेटवर रेखाच्या वाट्याला असं काही आलं की, त्याची तिने कल्पनाही केली नव्हती.
मेहबूब स्टुडिओमध्ये या सिनेमाचं शूटींग सुरू होतं. हिरो होता विश्वजीत. त्यादिवशी एक रोमॅन्टिक सीन शूट केला जाणार होता. रेखाला फक्त इतकंच माहित होतं. शूट सुरू झालं. दिग्दर्शक राजा नवाथे यांनी अॅक्शन म्हटलं आणि विश्वजीतने रेखाला किस करायला सुरूवात केली. रेखासाठी हा धक्का होता. ती सुटण्याचा प्रयत्न करत होती पण दिग्दर्शक कट म्हणायला तयार नव्हता. 5 मिनिटं हिरो रेखाला किस करत राहिला. रेखाचे डोळे अश्रूंनी डबडबले होते आणि समोर उभं सेटवरचं अख्खी युनिट आनंदाने टाळ्या वाजवत होतं सगळं एन्जॉय करत होती.
यासीर उस्मान यांनी रेखाच्या ‘रेखा- द अनटोल्ड स्टोरी’ या बायोग्राफीत या धक्कादायक प्रसंगाचा उल्लेख केला आहे. पुढे या प्रसंगाचा बोभाटा झाल्यावर, ही आपली चूक नव्हती तर राजा नवाथेची आयडिया होती, असं विश्वजीत म्हणाला होता. सीन खरा वाटावा, तिचे खरे भाव टिपता यावेत, म्हणून हा सीन करण्याआधी रेखाला कल्पना दिली गेली नव्हती, असंही ता म्हणाला. हा रेखाच्या नकळत घेतलेला किस सीन सिनेमात गरजेचा होता, असं दिग्दर्शकाचं मत होतं, असंही तो म्हणाला होता.