एकीकडे मुंबईत कोरोनाचा कहर वाढत आहे. पण दुसरीकडे मुंबई हळूहळू पूर्वपदावर आणण्याचेही सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प पडलेली फिल्म इंडस्ट्रीही येत्या काही दिवसांत सुरु होण्याची चिन्हे आहेत. पण तूर्तास मनोरंजन विश्वाने केंद्राकडे रिलीफ पॅकेजची मागणी केली आहे. होय, द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून या संकट काळात सिने इंडस्ट्रीला मदत देण्याची मागणी केली आहे.
मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही सर्वाधिक महसूल देणारी इंडस्ट्री आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत या इंडस्ट्रीचे मोठे योगदान आहे. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या इंडस्ट्रीकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष खेदजनक आहे. या इंडस्ट्रीवर अवलंबून असलेले अनेक रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांच्या मदतीसाठी आम्ही सरकारकडे सतत पाठपुरावा केला. मात्र सरकारकडून कुठलीही मदत मिळाली नाही. इंडस्ट्रीतील रोजंदारीवर काम करणा-या हजारो कामगारांची स्थिती बिकट आहे. काम नसल्याने त्यांच्या कुटुंबाचे हाल होत आहेत. अशास्थितीत सरकारने या कामगारांच्या मदतीसाठी पाऊले उचलावीत, असे द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईने आपल्या पत्रात म्हटले आहे.
द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईने सांगितले की, जूनच्या अखेरीस वा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सिनेमा व मालिकांचे शूटींग सुरु होईल, असे साधारण चित्र आहे.अशास्थितीत स्पॉटबॉय, स्टंटमॅन, मेकअप आर्टिस्ट, लाइट मॅन अशा अनेक रोजंदारी कामगारांची आर्थिक स्थिती आणखी बिकट होणार आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची आर्थिक स्थिती आधीच ढासळली आहे. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित काही संघटना, अमिताभ बच्चन, सलमान खान अशा काही दिग्गज अभिनेत्यांनी या कामगारांची आपल्या परिने मदत केली. पण फिल्म इंडस्ट्रीतील कामगारांची संख्या मोठी आहे. अनेकांना अद्यापही मदत मिळाली नाही. सरकारने या कामगारांना मदतीचा हात द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.