Join us

ड्रग्स तस्करी प्रकरणात ममता कुलकर्णीला दिलासा, पुराव्यांअभावी उच्च न्यायालयाकडून क्लीनचीट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 2:28 PM

Mamata Kulkarni :अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्स तस्करी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पुराव्यांअभावी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच ममता कुलकर्णीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे.

अभिनेत्री ममता कुलकर्णी(Mamata Kulkarni)ला ड्रग्स तस्करी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पुराव्यांअभावी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच ममता कुलकर्णीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे. अभिनेत्री ममताने याचिका दाखल करून आपल्याला ड्रग्ज घोटाळ्यात अडकवले जात असल्याचे म्हटले होते. तिच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नवा निर्णय घेत कुलकर्णी यांच्यावरील एफआयआरमध्ये केलेल्या आरोपांव्यतिरिक्त कोणताही पुरावा नसल्यामुळे ड्रग्ज प्रकरणातून तिची निर्दोष मुक्तता केली आहे.

ममता कुलकर्णीविरुद्ध सुरू असलेल्या २००० कोटी रुपयांच्या ड्रग्स तस्करीचा खटला उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या अभिनेत्रीवर तिचा पती विकी गोस्वामीसह ड्रग्स तस्करीचा आरोप होता. ममताच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. या कारणामुळे हे प्रकरण बंद केले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुशा देशमुख यांच्या खंडपीठाने अभिनेत्रीवरील ड्रग्सचा खटला रद्द केला आहे.

२०१६ साली ड्रग्ज प्रकरणात अडकली होती ममता कुलकर्णी २०१६ साली ठाणे पोलिसांनी २ हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी ममता कुलकर्णी आणि तिचा नवरा विकी गोस्वामीचे नाव समोर आले होते. कल्याणमध्ये १२ एप्रिल रोजी एका नायजेरियन ड्रग पेडलरला अटक केली होती. त्याच्या माहितीनुसार, ठाण्यातून २ तरुणांना अटक करण्यात आली. त्या तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरला अटक झाली होती. या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या 'एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक' या कंपनीवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी तिथून २ हजार कोटी रुपये किंमतीचं 'एफिड्रिन' ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी असल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणात ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडल्यामुळे तिलाही आरोपी करण्यात आले होते. मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असे सांगत तिने हा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ममता कुलकर्णी आणि तिचा पती हे गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात पसार झाले असून ते परत कधीही भारतात आलेले नाहीत.

टॅग्स :ममता कुलकर्णीअमली पदार्थ