कभी अलविदा न कहना, माय फ्रेंड गणेशा, वास्तूशास्त्र या चित्रपटातील एक चिमुकला बालकलाकार तुम्हाला आठवतोय का? या बालकलाकाराने वास्तू शास्त्र या चित्रपटात सुश्मिता सेनच्या मुलाची, कभी अलविदा ना कहना या चित्रपटात शाहरुख आणि प्रीती झिंटाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारली होती. हा गोंडस मुलगा प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. माय फ्रेंड गणेशा या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, हा कलाकार चित्रपटात मुलाच्या भूमिकेत दिसत असला तरी हा मुलगा नसून ही व्यक्तिरेखा एका मुलीने साकारली होती.
या मुलीचे नाव अहसास छन्ना असून ती आता चांगलीच मोठी झाली आहे. अहसास आता खूपच सुंदर दिसत असून काही वर्षांपूर्वी तिने मालिकांमध्ये मुलीची भूमिका देखील साकारली होती. देवों के देव महादेव या मालिकेत ती शिव आणि पार्वती यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. तसेच एम टिव्हीच्या फनाह या मिनी सिरिजमध्ये देखील ती झळकली होती.
अहसास छन्ना ही अगदी लहान असल्यापासून अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम करत आहे. केवळ चार वर्षांची असताना तिने पहिले ऑडिशन दिले होते. तिला अभिनयाची आवड ही तिच्या आईवडिलांमुळेच निर्माण झाली. तिचे वडील इक्बाल छन्ना हे एक प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांची निर्मिती केली आहे. तिची आई कुलबीर कौर ही देखील अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
अहसास छन्ना दिसायला अतिशय सुंदर असून ती तिचे फोटो नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पोस्ट करत असते. तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलो करत असतात. तिने आता चित्रपट, मालिकांनंतर डिजिटल क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. कोटा फॅक्टरी, गर्ल्स हॉस्टेल यांसारख्या वेबसिरिजमध्ये तिने काम केले होते. या वेबसिरिजमधील तिच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते.