नव्वदच्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी रसिकांना वेड लावलं होतं. याच काळात अनेक अभिनेत्री यशशिखरावर होत्या. असं असतानाही नव्या अभिनेत्रींनी आपल्या अदा आणि सौंदर्यानं त्यावेळच्या प्रस्थापित अभिनेत्रींना कडवी टक्कर दिली होती. मात्र काही मोजके सिनेमा केल्यानंतर या अभिनेत्री एक तर लग्न करुन त्यांच्या खासगी आयुष्यात सेटल झाल्या. तर काही अभिनेत्रींचा बॉलीवुडच्या कडव्या स्पर्धेत निभाव लागू शकला नाही त्यामुळे त्या कुठे गेल्या हे कुणालाच कळलं नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रंभा. 'जुडवाँ' आणि 'बंधन' अशा सिनेमात रंभा सलमानसह रोमान्स करताना पाहायला मिळाली होती. मात्र हीच रंभा कुठे आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे.
2010 साली रंभानं व्यावसायिक इंद्रन पद्मनाथन याच्याशी लग्न केलं. लग्नानंतर रंभानं बॉलीवुडला बाय-बाय केला. नव्वदच्या दशकात एक यशस्वी अभिनेत्री म्हणून रंभाकडे पाहिलं गेलं. याला कारणही तसंच होतं. रंभा ही त्याकाळातील अभिनेत्री दिव्या भारती हिची डुप्लिकेट असल्याचे बोललं जात असे. त्यामुळे रंभाच्या पारड्यात बड्या बड्या दिग्दर्शकांचे सिनेमा पडले. तिला विविध दिग्गज अभिनेत्यांसह काम करण्याची संधी लाभली. मात्र या संधीचा रंभा लाभ घेऊ शकली नाही. त्यामुळे बड्या कलाकारांसह काम करुनही रंभाला लवकरच बॉलीवुडमधून आपला गाशा गुंडाळावा लागला.
सलमान खान, अजय देवगण, रजनीकांत, गोविंदा, अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती अशा बड्या कलाकारांसह रंभा रुपेरी पडद्यावर झळकली होती. तेलुगू सिनेमापासून रंभाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.1995 साली जल्लाद सिनेमातून रंभानं हिंदी रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. त्यानंतर 'दानवीर', 'प्यार दिवाना होता है', 'कहर', 'जुडवाँ', 'जंग', 'सजना', 'बंधन', 'घरवाली-बाहरवाली', 'बेटी नंबर वन', 'क्रोध', 'दिल ही दिल में' अशा विविध सिनेमात काम केलं. मात्र लग्नानंतर तिने आपल्या संसारात लक्ष घातलं. सुरुवातीलाच तिच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ आलं.
पती इंद्रनसह वादाचं वृत्तही समोर आलं. मात्र काही दिवसांतच दोघांमधील हा वाद मिटला. रंभाचा पती इंद्रन हा मॅजिकवुड्स नावाच्या कंपनीत चेअरमन आणि सीईओ आहे. रंभाच्या दोन जुळ्या मुली असून एकीचे नाव लान्या आणि दुसरीचे नाव साशा असं आहे.तिला एक मुलगाही आहे.शिवीन असे तिच्या मुलाचे नाव आहे.